वढोदा वनक्षेत्रातंतर्ग नांदवेलच्या जंगलात आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

0
भुसावळ |  प्रतिनिधी :   वढोदा वनक्षेत्रांतर्गत येणार्‍या नांदवेल जंगलात अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली असून हाडांचा केवळ सापळाच उरलेला असल्यामुळे महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

नांदवेल जंगलातील वनखंड क्रं. ५७२ मध्ये एका टेकडीवर अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह पडून असल्याची घटना समोर आली. तेथील पोलीस पाटलांनी कुर्‍हा पोलीस चौकीत खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.

यावेळी अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत पडून होता. त्या महिलेची साडी व इतर कपडे तीस फुटाच्या अंतरावर झुडपांमध्ये अडकलेले होते. तसेच काही अंतरावर धारदार विळासुद्धा पडलेला होता.

पूर्ण मृतदेह कुजलेला असल्यामुळे केवळ हाडांचा सापळा व काही प्रमाणात चेहरा हा सुस्थितीत होता. मुक्ताईनगर पो.स्टे.चे पीएसआय वंदना सोनवणे यांनीसुद्धा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

घातपाताचा संशय- मृत महिलेचे काही अंतरावर पडलेले कपडे व धारदार विळा आढळल्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला असून इतक्या निर्जन ठिकाणी एकटी महिला जावू शकत नाही.

कारण मृतदेह आढळला तो परिसर सिंदीचा नाला म्हणून प्रसिद्ध आहे आणि या परिसरात पट्टेदार वाघाचा राबता आहे. त्यामुळे कोणी इकडे फिरकत नाही.

वनविभागाचा ठिसाळ कारभार – सदर मृतदेह हा अंदाजे दिड महिन्यापासून पडलेला असू शकतो असा कयास जाणकार व्यक्त करत आहेत. वाघाचा संचार असलेल्या परिसरात सुमारे दिड महिन्यापासून मृतदेह पडलेलाअसूनही वन विभागाच्या कोणत्याच अधिकारी व कर्मचार्‍याला याचा थांगपत्ताही लागत नाही ही शोकांतिका आहे.

वाघाच्या हालचालीचे बारिक निरिक्षण करून त्यांच्या संचारास काही अडथळा येणार नाही याची खबरदारी वनविभागाने घ्यायची असते. मात्र ज्या परिसरात एका महिलेचा घातपात होतो त्याचठिकाणी वाघाची शिकार सुध्दा होवू शकते ही शक्यता नाकारता येत नाही.

ही घटना पोलिस पाटलाला समजते. मात्र वनविभागाला माहित होत नाही. यावरून वनविभाग किती सजग आहे हे लक्षात येते. डोलारखेडा जंगलात कुजलेल्या अवस्थेत पट्टेदार वाघिण आढळली होती. तसेच काळविट सुध्दा आढळले होते. आता महिलेचाच मृतदेह आढळला आहे.

ओळख पटविण्याचे आव्हान-कुर्‍हा पोलिसांनी घटनास्थळावरुन मयत महिलेच्या काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या महिला आरोग्य अधिकार्‍याने घटनास्थाळीच शवविच्छेदन करुन याच ठिकाणी सदर मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला.

संपूर्ण शरीरच कुजलेले होते. तर केवळ चेहर्‍याचा काही भाग सुस्थितीत होता. त्यावरुन महिलेची ओळख पटविणे पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे.

LEAVE A REPLY

*