नेपाळ मोजणार एव्हरेस्टची उंची

0
काठमांडू | वृत्तसंस्था :  गेल्या काही वर्षांपासून ‘एव्हरेस्ट’ पर्वताची उंची अनेक प्रश्‍नांच्या विळख्यात सापडली आहे.

काही तज्ज्ञांच्या मतानुसार २०१५ मध्ये बसलेल्या शक्तीशाली भूकंपाच्या धक्क्याने जगातील सर्वात उंच असलेल्या या पर्वताचे टोक आकसलेले आहे. तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे एव्हरेस्टवरील बर्फाची चादर विरघळत असल्याने या पर्वताची उंचीही कमी होत चालली आहे.

भूगर्भातील टेक्टॉनिक प्लेटच्या अप्रत्यक्ष हालचालींमुळे एव्हरेस्टची उंची कमी न होता ती वाढत असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. अशा अनेक शंका अथवा अंदाजांना पूर्णविराम देण्यासाठी नेपाळ सरकारने या पर्वताची उंची पुन्हा एकदा मोजण्यासंबंधीच्या प्रयत्नांना सुरुवात केली आहे.

‘एव्हरेस्ट’ची उंची सर्वप्रथम १८५६ मध्ये मोजली गेली होती. त्यावेळी या पर्वताला १५ वे शिखर या नावाने ओळखले जात असे. ब्रिटिश सर्वेक्षक अँड्यु्र वॉ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने समुद्र सपाटीपासून एव्हरेस्ट पर्वताची उंची ८८४० मीटर अथवा २९००२ फूट मोजली. त्यानंतर या हिमाच्छादित शिखराचा शोध लावणारे ब्रिटिश सर्वेक्षक सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव या पर्वताला देण्यात आले.

२०१२ मध्ये आम्ही एव्हरेस्टची उंची मोजण्याचा विचार केला होता. मात्र, ती कृतीत उतरली नाही. २०१५ च्या भूकंपानंतर उपस्थित झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी या पर्वताची उंची मोजण्याचा निर्णय आम्ही घेतला असून यास ९० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, असे नेपाळ सर्वेक्षण खात्याचे गणेश प्रसाद भट्टा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*