निवडणूक आयोगाच्या सचिवांनी दारुबंदी अधीक्षकाचे काढले वाभाडे

0

जळगाव ।  प्रतिनिधी :  निवडणुकीमध्ये मतदारांना पैशांचे प्रलोभन देण्याचे अनेक प्रकार घडत असतात. त्यामुळे आचारसंहिंतेचा भंग होवून कायदा सुव्यवस्था निर्माण होत असते. हे प्रकार रोखण्यासाठी मनपातर्फे केवळ 6 भरारी पथके तयार करण्यात आली आहे. परंतु ही पथके संपूर्ण प्रभागांमध्ये लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी प्रभागनिहाय 19 भरारी पथके तयार करण्याच्या सुचना राज्य निवडणुक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी आढावा बैठकीत निवडणुक अधिकारी यांना दिले.

शहरातील 19 प्रभांमध्ये 75 जागांसाठी दि. 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा नियोजनाचा आढावा बैठक महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात पार पडली. आढावा बैठक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी घेतली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, मनपा आयुक्त व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत डांगे उपस्थित होते.

बैठकीला सर्व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसह वन विभागाचे अधिकारी, राज्य परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, बॅँक व महसूल विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.

निवडणुकीच्या खर्चाकडे बारकाईने लक्ष ठेवा!

निवडणुक लढविणार्‍या उमेदवारांकडून केला जाणारा पेट्रोल, मोबाईल रिचार्ज, प्रचारामध्ये वापरण्यात येणार्‍या झेंड्यापासून तर जेवनाचा खर्चाकडे बारकाईने लक्ष देवून ते खर्च तपासण्याच्या कडक सूचना चन्ने यांनी दिल्या. निवडणुकीत उमेदवारांनी केले खर्च काढण्यात निवडणुक आयोगाला आतापर्यंत अपयश आले आहे. त्यामुळे निवडणुक खर्चाचे काम करतांना गांर्भीय लक्षात ठेवूनच कामे करण्याचे आदेश शेखर चन्ने यांनी दिले.

पोलिसांच्या कामाचा घेतला आढावा!

निवडणुकीच्या काळात शहरातील हॉटेल्स, बियरबार यासह शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश शेखर चन्ने यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले. तसेच उपद्रवी असलेल्यांवर एमपीडीए व तडीपार असलेल्यांवर काय कारवाई केली.

याबाबतची माहिती देखील चन्ने यांनी घेतली. यावर डिवायएसपी यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून उपद्रवींवर आम्ही कारवाई करीत आहोत. शहरातील 27 जणांना हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच एमपीडीएचे प्रस्ताव देखील देण्यात आले असून त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सचिन सांगळे यांनी सांगितले.

सोशल मीडियाद्वारे जनजागृती

आढवा बैठकीत निवडणुक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी आयुक्त डांगे यांना निवडणुक तयारी तसेच मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत माहिती विचारली. यावेळी आयुक्तांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सोशल मिडीया, व्हॉटसअप, बँनर आदी माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे सांगितले. तर निवडणुकीबाबतची सर्व तयारी पूर्ण झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

निवडणूक प्रक्रियेबाबत 19 रोजी कार्यशाळा

निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमध्ये काय करावे, काही प्रसंग घडल्यास त्यावेळी काय करावे, एव्हीएम मशिनबाबतची माहिती तसेच निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचार्‍याला असलेली जबाबदारी याबाबतची संपूर्ण माहिती देण्यासाठी निवडणुक आयोगातर्फे दि.19 रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षकांना धरले धारेवर

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेत असतांना निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर एकही कारवाई का झाली नाही. याबाबतचा प्रश्न शेखर चन्ने यांनी अधिक्षक एस. एल. आढाव यांना विचारला. यावर दैनंदिन कामकाजा शिवाय अपेक्षित उत्तर आढाव यांच्याकडून मिळाले नाही.

तसेच निवडणुकीच्या आगामी काळातील नियोजनाबाबत आढाव यांनी अपेक्षित उत्तर न दिल्याने शेखर चन्ने यांनी राज्य उत्पादन शुल्काचे अधिक्षक आढाव यांना धारेवर धरत त्यांचा खरपूस समाचार घेतला. तसेच त्यांच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करीत कारवाई करण्याचे आदेश चन्ने यांनी दिले.

सध्याच्या मतदार यादीवरच निवडणूक घ्या!

जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीमध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करु नका. कारण चुका चुरुस्त करीत असतांना घोळ होत असतो. त्यामुळे जाहीर झालेलया सध्याच्या मतदार यादीवरच निवडणुक घ्या. त्याचप्रमाणे मतपत्रिकेचे वाटप करताना निवडणुक आयोगाने तयार केलेल्या अ‍ॅपचा वापर करा. तसेच मतपत्रिका मतदारांपर्यंत पोहचल्या की नाही ? यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देखील मनपा प्रशासनासह निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची असल्याचे सांगत त्यांनी कर्मचार्‍यांना सुचना दिल्या.

LEAVE A REPLY

*