आधारकार्डमधील बनवाबनवी – मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता; दोघांना पोलीस कोठडी

0
जळगाव ।  प्रतिनिधी :  शहरातील गोलाणी मार्केटमधील आधारकार्ड दुरुस्ती केंद्रावर आधारकार्ड स्कॅन करून फोटोशॉपमधून त्यावरील नाव, पत्ता बदलवितांना हा प्रकार एका ग्राहकाच्या लक्षात आला होता. त्याच्या तक्रारीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोघांना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि.16 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आधार दुरुस्ती केंद्रावरील बनवाबनवीमुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आधारकार्ड दुरुस्ती केंद्रातून सीपीयु, प्रिंटर व काही कागदपत्रे जप्त केली असून त्यानुषंगाने पोलिस तपास करीत आहे.

गेंदालाल मिल परिसरात राहणारे वसीम शेख यांच्या आधारकार्डवरील नंबर घेवून ठाणे नायगाव येथील सागर राम सिंग या व्यक्तीचे आधारकार्ड बनवित असतांना हा प्रकार वसीम शेख यांच्या लक्षात आला होता. त्यांनी याबाबत विचारणा केल्याने आधारकार्ड दुरुस्ती केंद्राचे महेश राठी यांनी ती प्रिंट फाडली होती.

यावेळी शेख यांनी ती प्रिंट पाहण्यासाठी मागितली असता, राठी यांनी कागदाचे तुकडे तोंडात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. वसीम शेख यांनी तक्रार केल्यानंतर महेश राठी व आरटीओ एजंट शेख फारुख शेख हुसेन या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

डुप्लीकेट आधारकार्डचा आरटीओ कार्यालयात एनओसीसाठी वापर

शेख फारुख हा आरटीओ एजंट आहे. त्याने महेश राठी यांना सांगून ठाणे येथील इसमाचे डुप्लीकेट आधारकार्ड केवळ 200 रुपयांत बनवित असल्याचे तपासात समोर आले. दरम्यान ही व्यक्ती ठाणे येथे कुठे राहते याचा पोलिस शोध घेत आहे. तसेच यामागील मुख्य सुत्रधाराचा देखील पोलिस शोध घेत आहे. तसेच फारुख यांने डुप्लीकेट आधारकार्डचा कुठे कुठे व कसा वापर केला आहे. या देखील पोलिस तपास करीत आहे.

दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

महेश राठी व शेख फारुख शेख हुसेन या दोघांना अटक करून न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना दि.16 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.

डुप्लीकेट आधारकार्ड बनविणारी टोळी असल्याचा पोलिसांना संशय

आधारकार्ड ही भारत सरकारतर्फे व्यक्तीच्या ओळखीकरिता सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा गैरफायदा घेवून बनावट आधारकार्ड बनविणारी टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या दोघांची पोलिस कसून चौकशी करीत आहे.

जिल्ह्यातील 15 आधार केंद्रांवर दंडात्मक कारवाई

आधारकार्डमधील बनवाबनवी आणि नागरीकांकडुन अवाजवी पैसे घेणार्‍या 15 आधार केंद्रांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडेपाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आधार केंद्रांद्वारे आधार कार्ड बनविण्याचे काम देण्यात आले आहे. शासकीय नियमानुसार आधार केंद्राद्वारे देण्यात येणार्‍या कार्डासाठी शासनाने काही नियम व अटी घालुन दिल्या आहेत. असे असतांना आधार केंद्र चालकांकडुन मात्र सर्रासपणे हे नियम धाब्यावर बसवुन नागरीकांची आर्थिक पिळवणुक होत असल्याच्या तक्रारी महसुल प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.

त्यानुसार महसुल उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडेपाटील यांच्या आदेशाने जिल्ह्यातील आधार केंद्रांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील पाचोरा,भडगाव आणि चोपडा याठिकाणी ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. मोहीमेत 15 आधार केंद्रांवर नियमाचे पालन होत नसुन काही त्रुट्यादेखिल आढळुन आल्या. त्यामुळे या सर्व केंद्रचालकांना प्रत्येकी पाच हजार रूपये दंड करण्यात आला असल्याची माहिती अभिजीत भांडेपाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

*