जिल्ह्यात गुलाबी बोंडअळी पुन्हा सक्रिय : वेळीच उपाययोजना करण्याच्या उपाध्यक्षांच्या सूचना

0
जळगाव ।  प्रतिनिधी  :  जिल्ह्यात गुलाबी बोंडअळी पुन्हा सक्रिय झाली असून भडगाव तालुक्यात कृषी विभागाच्या शेतभेटीत गुलाबी बोंडअळीचे पतंग फेरोमन सापळ्यात अडकल्याचे आढळून आल्याचा अहवाल कृषी उपसंचालकांनी जि.प. कृषी समितीच्या आज झालेल्या सभेत सादर केला. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सुचना दिल्या.

जि.प. कृषी समितीची सभा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखील घेण्यात आली. या सभेत कापूस पिकावरील बोंड अळीचा प्रादुर्भाव व किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी या विषयावर चर्चा करण्यात आली. सभेत राज्य शासनाच्या कृषि विभागाचे कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा कृषी अधिकारी मधुकर चौधरी उपस्थित होते.

कृषी उपसंचालक भोकरे यांनी भडगाव तालुक्यात त्यांच्या शेतभेटीत गुलाबी बोंडअळीचे पतंग फेरोमन सापळ्यात अडकल्याचे आढळून आल्याचे सांगितले. याची पुढची अवस्था मादी पतंगाने फुलांमध्ये अंडी घालणे व त्यातून बाहेर पडणार्‍या अळीचा प्रादुर्भाव हे भविष्यातील लक्षणे असल्याचे सांगितले.

निंबोळी अर्काची फवारणी करा!

यासोबतच 1 टक्का निंबोळी अर्काची फवारणी केल्यास त्याचा गुलाबी बोंड अळीच्या प्रसार रोखण्यास पुरक म्हणून उपयोग होईल. लिंबाच्या पानांपासून देखील अर्क तयार करुन फवारणी केल्यास त्याचा सारखाच उपयोग होतो. या सोबतच शेतात पक्षी थांबे लावावेत. यावर पक्षी बसून ते अळी वेचून खातील व गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण होत असल्याचे कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी सांगितले.

सापळा पिकाद्वारे अळीला बसतो आळा

यासोबतच शेतकर्‍यांनी कपाशीत चवळी, मका यासारखी सापळा पिके लावावीत. सतत दोन दिवस जर 8 ते 10 पतंग सापळ्यात आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांची फवारणी हाती घ्यावी. त्यासाठी सायपरमेथ्रीन, प्रोफेनोफॉस, क्वीनॉलफॉस यासारखी अळीनाशक औषधी वापरावी. डायमेथोएट, थायोमेथोक्झाम, एक्टरा ही औषधी रसशोषक किडींसाठी उपयोगात येतात. त्यांचा उपयोग अळी मारण्यासाठी होत नाही. तरी शेतकर्‍यांनी लवकरात लवकर या उपायोजना करुन गुलाबी अळीचे नियंत्रण करावे असे आवाहन उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केले आहे.

फेरोमन सापळे लावून नियंत्रण शक्य

यासाठी कृषि विभागाने तयारी केली असून प्रत्येक कृषि केंद्रावर फेरोमन सापळे विक्रीस ठेवण्यात आले असून कृषि विभाग देखील एकरी पाच सापळे अनुदानावर वाटप करणार असल्याचे सांगितले. याचा वापर किटक थर्मामिटर म्हणून होईल व सतत दोन दिवस जर 8 ते 10 पतंग सापळ्यात आढळून आल्यास फवारणी हाती घ्यावी लागणार हे शेतकर्‍यास समजण्यास मदत होईल. तसेच मोठ्या प्रमाणात सापळे लावून यामध्ये गुलाबी बोंड अळीचे नर पतंग अडकवणे व त्यांना मारुन नष्ट करणे यामुळे पुढे होणारे प्रजनन थांबेल व अळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येणार असल्याचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*