थकीत सव्वा तीन कोटी वसुलीबाबत धरणगाव न.पा.प्रशासनाची टाळाटाळ

0

धरणगाव, | प्रतिनिधी :  येथील नगरपालिकेच्या हद्दीतील ११ भूमी अभिन्यास विकासकांनी नागरिकांना नागरी सुविधा पुरविल्या नसल्याने या अभिन्यासंकडे ३ कोटी २३ लाख रुपयांची कर आकारणी नगरपालिकेतर्ङ्गे करण्यात आलेली आहे. या अभिन्यासांची बिनशेती परवानगी रद्द करण्यात यावी असा प्रस्तावदेखील नगरपालिकेतर्ङ्गे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला होता.

परंतु बिनशेती रद्द न करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी दिला व रक्कम वसूल करण्याचे आदेश दिलेत. रक्कम वसुलीबाबत नगरपालिका प्रशासनातर्ङ्गे कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केलेली आहे.

पालिका हद्दीतील ११ विकासकांना बिनशेती परवानगी देतांना अभिन्यासात खडीचे रस्ते, कॉन्क्रीट गटारी, जलवाहिनी, विद्युत खांब, खुल्या भूखंडास तारेचे कम्पावुंड, दिवे या मुलभूत सुविधा पुरविण्याची अट पालिकेने टाकली होती. परंतु विकासकांनी या अटीची पूर्तता न केल्याने येथील रहिवाश्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते.

नागरिकांची मागणी लक्षात घेता नगरपालिकेने सदर सुविधांसाठी लागणारा खर्च विकासकांकडून वसुली बाबत नोटीस देण्यात आलेल्या आहेत. तसेच या अभिन्यासांच्या बिनशेती रद्द करणेबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते.

परंतु अभिन्यासात नागरिकांचा रहिवास असून ते नियमितपणे नगरपालिकेचा कर भरत असल्याने बिनशेती रद्द करता येणार नाही, म्हणून विकासकांकडील थकीत रक्कम वसूल करून नगरपालिकेने सोई पुरवाव्यात असे आदेश जिल्हाधीकार्‍यांकडून प्राप्त झाले होते असे महाजन यांनी म्हटले आहे.

पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना, विकासकामे संथगतीने होत आहेत. एकीकडे नागरिकांकडून ज्यांच्याकडे नळ नाही त्यांच्याकडून देखील वार्षिक ५०० रुपये नळपट्टी घेण्यात येते. आणि नगरपालिकेचा कर थकल्यास वसुली मोहीम राबविली जाते, विविध दाखले देतांना अडवणूक केली जाते. असे असतांना एवढी मोठी रक्कम का वसूल केली जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याबाबत माहिती घेतली असता नगरपालिकेतील सत्ताधारी यांनी दि. १०/०२/१६ रोजी या विकासंकांची बाजू घेत नागरिकांकडू आम्हाला सोई सुविधांची आवश्यकता नसल्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्यानंतर बांधकामाची परवानगी देण्यात यावी, अशी नामी शक्कल लढवून या विकासकांना वाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या ठरावासाठी काही आर्थिक व्यवहार तर झाले नाहीत ना? अशी शंका जितेंद्र महाजन यांनी उपस्थित केली आहे. नागरिकांना मुलभूत सोई मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत तरी सदर रक्कम तात्काळ वसूल करण्यात यावी, अशी मागणी जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

नागरिकांना आवाहन

या परिसरातील बाधीत नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, या बाबतीत न्यायालयात दावा दाखल करावयाचा असून येथील रहिवाश्यांनी संपर्क करावा, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*