जळगावचे कारागृह अधिक्षक डाबेराव दोन हजाराची लाच घेतांना ताब्यात : एसीबीची आज पहाटे सहा वाजेची कारवाई

0
जळगाव | प्रतिनिधी : येथील कारागृहाचे अधिक्षक डी. टी. डाबेराव आणि त्यांचा कॉन्स्टेबल आमले यांना अवघ्या दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने आज पहाटे सहा वाजता अटक केली.
ही कारवाई एसीबीचे उपअधिक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने अधिक्षक डाबेराव यांच्या निवासस्थानी केली.

या संदर्भात एसीबी पथकाने प्राथमिक स्वरुपात तपास केला होत. त्यानुसार जिल्हा कारागृहातून एखाद्या कैद्यास जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय सेवेसाठी पाठवायचे असेल तर तशा परवनगीसाठी जिल्हा कारागृह अधिक्षकांचा दर प्रत्येकी ५ हजार रुपये आणि एक बाटली असा आहे.

परवानगीसाठी अर्ज करताना ३ हजार आणि बाटली द्यावी लागते. प्रत्यक्ष कैद्यास नेताना २ हजारांचा व्यवहार पूर्ण होते. दिवसभरात किमान ४ ते ५ कैदी जिल्हा रुग्णालयात पाठवले जातात. म्हणजेच यातून किमान २० ते ३० हजारांचा व्यवहार होतो.

एका कैद्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या परवानगीचा व्यवहार ३ हजार रुपये व बाटलीपर्यंत पूर्ण झाला होता. कैद्याला पहाटे रुग्णालयात पाठवायचे तर आज पहाटे ५ ला त्याच्या नातेवाईकाला डाबेराव यांनी बंगल्यावर २ हजार रुपये देण्यासाठी बोलावले होते.

त्यानुसार संबंधित नातेवाईक व एसीबी पथक पोहचले. नंतर सकाळी ८ च्या सुमारास २ हजार रुपये घेताना आमले व डाबेराव यांना ताब्यात घेण्यात आले.

जळगाव जिल्हा कारागृह हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मागील बाजूस आहे. या ठिकाणी महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पदाचे अधिकार प्राप्त प्रांताधिकार्‍यांची वर्दळ असते.

अशाही वातावरणात कैद्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्याचे धाडस कारागृहातील साखळी करते हे विशेष.

पराग सोनवणेंचा धडाका

जळगाव येथे एसीबीचे उपअधिक्षक म्हणून रुजू झालेल्या पराग सोनवणे यांनी लाच घेणार्‍या अती वरिष्ठ अधिकार्‍यांना सापळ्यात पकडण्याच्या अनेक कारवाया यशस्वी केल्या आहेत.

त्यांनी आतापर्यंत तापी पाटबंधारेचे अभियंता, महावितरणचे अभियंता, मनपा उपायुक्त, समाज कल्याणचे वरिष्ठ अधिकारी आदींना जाळ्यात पकडले आहे.

LEAVE A REPLY

*