जळगाव महापालिका निवडणूकीत युतीचा ‘टाय टाय फिस्स्‌’! : नेत्यांची टोलवा-टोलवी : कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

0

जळगाव । प्रतिनिधी :   गेल्या काही दिवसांपासून भाजप-सेना युतीबाबत पक्षश्रेष्ठी सकारात्मक असले तरी निर्णय मात्र अधांतरीच आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेने 75 उमेदवारांची अंतीम यादी तयार केल्यामुळे युतीची शक्यता मावळली असून युतीचा खर्‍याअर्थाने ‘टाय टाय फिस्स्‌’ झाला आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप-सेना युतीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. माजी आ.सुरेशदादा जैन आणि जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर सुरेशदादांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीदेखील भेट घेतली. दोन्ही पक्षश्रेष्ठींनी युतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन स्थानिक पातळीवर चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे सांगितले परंतु युतीबाबत केवळ चर्चाच सुरु आहे. नव्हेतर अफवांचे पेवदेखील फुटले आहे.

मात्र अद्यापही जागा वाटपाचा तोडगा निघाला नसून निर्णयदेखील अधांतरीतच आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून भाजपामध्ये महापौरांसह मनसे, खाविआ, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्याने पारडे जड असल्याचा दावा भाजप करु लागला आहे. तर दुसरीकडे काही नगरसेवकांनी पक्षांतर केल्यामुळे शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नसून सक्षम उमेदवार असल्याचा दावा शिवसेना करु लागली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ एक दिवस उरला आहे. ना.गिरीश महाजन आणि शिवसेना नेते माजी आ.सुरेशदादा जैन हे अखेरच्या क्षणापर्यंत युतीसाठी सकारात्मक आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र अद्यापही चर्चा झालेली नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने आपापल्या 75 उमेदवारांची अंतीम यादी तयार केली असल्याने युतीची शक्यता मावळल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या युतीचा ‘टाय टाय फिश्श्‌’ झाला आहे.

स्थानिक पातळीवर चर्चा नाही! – आ.भोळे

मनपा निवडणुकीत भाजप, शिवसेना युतीबाबत चर्चा सुरु आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असली तरी स्थानिक पातळीवर चर्चा झाली नसल्याचे आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले. भाजपच्या 75 उमेदवारांची यादी तयार झालेली आहे. काही उमेदवारांनी अर्ज देखील भरलेले आहे.

तर काही उमेदवार उद्या दि.11 रोजी अर्ज भरणार आहेत. सर्व उमेदवार तोलामोलाचे आहेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यावी व कोणाची उमेदवारी नाकारावी असा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे यादी जाहीर करायला उशिर होत असल्याचे आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले. युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. वरिष्ठ नेते निर्णय घेतील. परंतु स्थानिक पातळीवर अद्यापही चर्चा झालेली नाही. त्यामुळे 75 उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असल्याचेही आ.भोळे यांनी सांगितले.

आता लढाई मैदानातच! – रमेशदादा जैन

मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या 75 उमेदवारांची अंतिम यादी तयार झालेली आहे. आता पुढची लढाई निवडणुकीच्या मैदानातच होणार असल्याची खाविआचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
शहराच्या विकासासाठी आम्ही भाजपासमोर युतीचा विषय मांडला होता. मात्र त्यांचे तोडाफोडीचे राजकारण आमच्या तत्वात बसत नाही. मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची 75 उमेदवारांची यादी तयार असल्याचेही रमेशदादा जैन यांनी सांगितले.

आमच्या 75 उमेमदवारांची यादी तयार असल्याने युतीचे काय झाले? हे तुम्ही समजू शकतात, असे सूचक विधान देखील त्यांनी केले. आता पुढची लढाई निवडणुकीच्या मैदानातच होणार असून जळगावची जनताच योग्य तो न्याय करेल असेही ते म्हणाले. खाविआतुन जाणार्‍यांमुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. आमच्या अनेक सक्षम उमेदवार असून उद्या दि.11 रोजी त्यांचे अर्ज भरले जाणार असल्याचेही रमेशदादा जैन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*