Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

डोळ्या देखत कोर्टचौकातील ३१ दुकाने जमीनदोस्त : जळगाव महानगरपालिकेची अतिक्रमण निर्मुलन मोहिम

Share
जळगाव | दि.१३ | प्रतिनिधी :  शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मुलनाची महानगरपालिकेने मोहिम राबविली. एकाचवेळी पाचही रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. कोर्ट चौकातील दुकाने जेसीबीने तोडण्याचा प्रयत्न करताच दुकानदारांनी प्रचंड घोषणाबाजी करुन विरोध केला. अक्षरश: दुकानदार जेसीबीसमोर बसून ‘आमच्या रोजीरोटीवर जेसीबी चालवू नका’ अशी आर्त हाक देत, जेसीबीसमोर परिवारासह जीव देवू असा इशारा देताच पोलीसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने अगदी अर्ध्यातासात ३१ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. डोळ्या देखत दुकाने पाडत असतांना दुकानदारांच्या डोळ्यातील अश्रू तराळत होते.
शहरातील मुख्यरस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आयुक्त चंद्रकांत डांगे आणि पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांनी पाहणी केली. त्यानुसार नगररचना विभागाला कोर्ट चौक ते टॉवर चौक, बळीरामपेठ ते भिलपुरा चौक, घाणेकर चौक ते सुभाष चौक, रथचौक, सुभाष चौक ते बेंडाळे चौक, पांडे चौक, बेंडाळे चौक ते चित्रा चौक, सुभाष चौक, चित्रा चौक ते कोर्टचौक, चित्रा चौक ते टॉवर चौकपर्यंत रस्त्यांची मार्किंग केली. त्यानुसार आजपासुन अतिक्रमण निर्मुलनाच्या कारवाईला सुरुवात करण्यत आली आहे. शहरातील पाचही प्रमुख रस्त्यांवर सकाळी ११ वाजेपासुन अतिक्रमण निष्काशीत करण्यात आले.
पोलीस बंदोबस्ताअभावी दीडतास कारवाईला उशिर
अतिक्रमण निर्मुलन मोहिमेसाठी पथकातील सर्व कर्मचार्‍यांनी महापालिकेच्या प्रांगणात ९ वाजता येण्याची सूचना दिली होती. त्यानुसार पथकातील २०८ कर्मचार्‍यंपैकी १८९ कर्मचारी हजर होते. तर १९ कर्मचारी गैरहजर होते. यावेळी उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी कर्मचार्‍यांनी हजेरी घेवून सूचना दिल्या. महापालिकेेचे पथक कारवाईसाठी सज्ज होते. मात्र पोलीस उशिरा आल्याने कारवाईला तब्बल दीडतास उशिर झाला.
कोर्टचौकातील दुकानदारांना पोलीसांनी घेतले ताब्यात
महानगरपालिकेचे पथक कोर्टचौकात कारवाई पोहचल्यानंतर येथील दुकानदारांनी जेसीबीसमोर बसून प्रचंड विरोध केला. बंद करो…. बंद करो… हुकूमशाही बंद करो…. अशा घोषणा देवून दुकानदार विरोध करत होते. कारवाई दुकानदारांनी जेसीबीवर चढून जीव देण्याचा इशारा दिला.
दुकानारांचा आक्रोश वाढत असतांना आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांना फोन केला. त्यानंतर पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे आणि अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव त्याठिकाणी आले. पोलीसांनी वाद घालणार्‍या आणि कारवाईला विरोध करणार्‍या दुकानदारांना ताब्यात घेतल्यानंतर अगदी अर्ध्यातासात ३१ दुकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आलीत.
मनपा कर्मचारी आणि दुकानदारांमध्ये वाद
अतिक्रमण निर्मुलनाच्या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेचे कर्मचारी आणि दुकानदारांमध्ये शाब्दीक वाद झाला. कोर्टचौकात एका दुकानदाराने कर्मचार्‍याची कॉलर पकडली होती. वाद वाढत असतांना आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी वाद मिटवून शांततेत करण्याची सूचना दिली. त्यानंतर कॉंग्रेस भवनसमोर, भवानीपेठ, नेहरु चौकात देखील वाद झाला.
१३ वर्षानंतर शहरात अतिक्रमणाची मोठी कारवाई
शहरात तत्कालीन मनपा आयुक्त डी.पी.मेतके, संजय काकडे यांच्यानंतर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी एकाचवेळी पाच रस्त्यांवर अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई केली. १३ वर्षानंतर शहरात अतिक्रमणाची मोठी कारवाई होत असल्याची चर्चा रंगत होती.
कोर्टचौकात सौम्य लाठीचार्ज
कोर्टचौकात अतिक्रमणाची कारवाई करित असतांना दुकानदारांनी विरोध केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तसेच गर्दी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. गर्दीला पांगविण्यासाठी पोलीसांनी सौम्य लाठीचार्जदेखील केला.
धार्मिकस्थळे शाबुत
अतिक्रमणाची कारवाई करित असतांना ज्या-ज्या ठिकाणी धार्मिकस्थळे असतील, त्या-त्या धार्मिकस्थळांना हात लावू नये, अशी सक्त सूचना आयुक्तांनी कर्मचार्‍यांना दिली होती. त्यामुळे धार्मिकस्थळे वगळता अन्य अतिक्रमण तोडण्यात आली.
आयुक्त देखील परवानगी नसलेल्या १३ व्या मजल्यावर बसतात :  आ.राजूमामा भोळे यांचा हस्तक्षेप
भवानीपेठेत महानगरपालिकेचे पथक अतिक्रमणाची कारवाई करित असतांना व्यापार्‍यांनी विरोध केला. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता आ.राजूमामा भोळे त्याठिकाणी येवून कारवाईला विरोध केला.अतिक्रमण असल्याचे कारण देवून अधिकारी दुकाने तोडत आहेत. महानगरपालिकेच्या वरच्या मजल्यांना तरी परवानगी आहे का? आयुक्त देखील परवानगी नसलेल्या १३ व्या मजल्यावर बसतात. हा कुठला न्याय? अशा शब्दात आ.भोळे यांनी संताप व्यक्त केला.
त्यानंतर त्याठिकाणी आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे, तहसीलदार अमोल निकम हे देखील आले. आ.राजूमामा भोळे यांनी विरोध केल्याचे सांगताच आयुक्तांनी दुकानांसमोरील सर्व शेड तोडण्याचे आदेश दिले.
जेसीबी नादुरुस्त
अतिक्रमण मोहिमेसाठी स्वतंत्र जेसीबी आणि टॅक्टर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जुन्या बसस्टॅण्डसमोर कारवाई सुरु असतांना जेसीबी बंद पडले. त्यामुळे कारवाई रखडली होती. अखेर दुसरे जेसीबी मागवून कारवाईला सुरुवात केली.
३७० पोलीसांचा बंदोबस्त
अतिक्रमणाच्या कारवाईसाठी जिल्हाभरातुन पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. ३७० पोलीसांचा बंदोबस्त होता. परंतु काही ठिकाणी वाद सुरु असतांनाही पोलीसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलीसांच्या भूमिकेबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात होते.
अधिकार्‍यांकडून पाहणी
शहरात एकाचवेळी पाचही रस्त्यांवर अतिक्रमणाच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, तहसीलदार अमोल निकम, आरटीओ निरीक्षक शिरसाठ, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांनी कारवाई सुरु असतांना भेट देवून पाहणी केली.
पोटावर नका मारु हो!
कोर्टचौकात दुकानांवर अतिक्रमणाची कारवाई करतांना दुकानदारांसह त्यांच्या परिवारांनी विरोध केला. आमची रोजीरोटी आहे, पोटावर मारु नका हो, आम्ही जगायचे कसे अशी आर्त हाक दुकानदारांनी दिली. मात्र प्रशासनाने केवळ अर्ध्यातासातच डोळ्यासमोर दुकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. त्यामुळे दुकानदारांच्या डोळ्यात अश्रु तराळत होते.
पथकातील १९ कर्मचारी गैरहजर
अतिक्रमण निर्मुलन मोहिमेसाठी २०८ कर्मचार्‍यांची नेमणूक करुन पथक तयार करण्यात आले होते. सर्व कर्मचार्‍यांना कारवाईवेळी हजर राहण्याची सूचना दिली होती. सकाळी उपायुक्तांनी हजेरी घेतली. २०८ कर्मचार्‍यांपैकी १८९ कर्मचारी हजर होते. तर १९ कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे गैरहजर कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला.
दुकानांचे ओटे, शेड तोडले
कोर्ट चौक ते टॉवर चौक, बळीरामपेठ ते भिलपुरा चौक, घाणेकर चौक ते सुभाष चौक, रथचौक, सुभाष चौक ते बेंडाळे चौक, पांडे चौक, बेंडाळे चौक ते चित्रा चौक, सुभाष चौक, चित्रा चौक ते कोर्टचौक, चित्रा चौक ते टॉवर चौकापर्यंत पाचही रस्त्यांवर एकाचवेळी अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. मार्किंगनुसार दुकानांचे ओटे, शेड देखील तोडण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!