Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

# Video # शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण : आमदार हरिभाऊ जावळे

Share

यावल | प्रतिनिधी : तालुक्याची संजिवनी असलेल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होत असून आगामी अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण होईल. पुढील वर्षातील पावसाळ्याचे पाणी या प्रकल्पात साठविले जाईल. अशी माहिती आमदार हरिभाऊ जावळे व जळगाव पाटबंधारे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांनी पत्रकारांशी अनोपचारिक चर्चा करताना दिली.

तापी नदीवर उभारण्यात येत असलेल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे अपूर्णावस्थेतील कामाविषयी आमदार जावळे यांनी प्रकल्प साइटवर भेट देऊन सुरु असलेल्या प्रकल्प कामाविषयी माहिती जाणून घेतली.

शेळगाव बॅरेज हा मध्यम प्रकल्प शेळगाव (तालुका ) जळगाव गावापासून दीड किलोमीटर अंतरावर व यावलच्या दक्षिणेस बारा किलोमिटरवर तापी नदीवर बांधकाम अवस्थेत असून प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे बांधकाम भौतिक दृष्ट्या ६४टक्के एवढे पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची साठवण क्षमता ११६.३६६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४.११ टीएमसी एवढी असून त्यात यावल तालुक्यातील ९१२८ हेक्टर सिंचन क्षेत्र पाण्याखाली असणार आहे. प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता सन २०११-१२ चे दरसूचीनुसार ६९९.४८ कोटी रुपयांची आहे.त्यास नोव्हेंबर २o१६मध्ये राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. प्रकल्पास६०x५५ फूट आकाराचे अठरा दरवाजे असून दरवाजे प्रकल्प साइटवर येऊन पडलेले आहेत.

या प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्र अंतर्गत वाघुर नदी वर कडगाव जोगलखेडा रस्त्याला २०.९४ लाख रुपये पूलासाठी मंजूर आहे. यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळ मोर नदीवर मोठा उंच पुलासाठी ५३.०९ लाख रुपये मंजूर आहेत.तर भुसावळ पिळोदा रस्त्यावर मोर नदीवर२०.४२ लाख रुपये मंजूर आहेत. या तीन ठिकाणी उंच पूल बांधण्याचे नियोजन असून त्यासाठीच्या निविदा नुकत्याच निघाल्या असून आगामी काळात कंत्राटदारांना काम देण्यासंदर्भात आदेश होतील दरम्यान प्रकल्पाच्या खालील बाजूस तापी नदीवर जळगाव शेळगाव बामणोद रस्त्यावरील उंच पूल बांधणे संदर्भात ३९.१९ लाख रुपये मंजूर असून या पुलासाठी देखील निविदा लवकरच निघणार आहे.

या प्रकल्पासाठी यावल,भुसावळ, व जळगाव तालुक्यातील पंधरा गावातील ६६०.०५हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे. तर ४० हेक्टर वनजमीन मिळून एकूण ७००.०५ हेक्टर वनजमीन संपादित केली आहे.

आगामी काळातील पावसाळ्यात धरणात पाणीसाठा झाल्या नंतर सिंचनासह, जवळपासच्या ग्रामपंचायती व नगरपालिकांना तसेच औद्योगिक क्षेत्रात देखील पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे मुख्य धरणाचे बांधकाम भौतिक दृष्ट्या ६४ टक्के पूर्ण झालेले आहे. तसेच वक्राकार दरवाज्यांचे द्वार निर्मितीचे व उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. डाव्या तीरावरील भरावाचे काम ९०टक्के पूर्ण.तर उजव्या तीरावरील भरावाचे काम ८० टक्के पूर्ण. नदीपात्रात सांडवा माथा तलांक१६३.२४ मीटर पर्यंत पूर्ण. अंजाळे, पिळोदा, आणि जोगलखेडे येथील पूलांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर शेळगाव – बामणोद उंच पुलाचे सविस्तर अंदाज पत्रक तयार करण्याचे काम प्रगतीत आहे.

आमदार जावळे यांचे समवेत जळगाव पाटबंधारे मध्यम प्रकल्प चे कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, प्रकल्प सल्लागार प्रकाश पाटील, कनिष्ठ अभियंता हर्षल सोनवणे, तहसीलदार कुंदन हिरे, बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी,माजी जि. प. सदस्य हर्षल पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैन सिंग राजपूत आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!