वृक्ष लागवड कराच..पण जगवाही !

0
अमोल कासार |  जळगाव । दि.4  :  पर्यावरणाचा दिवसेंदिवस र्‍हास होत आहे. त्यामुळे केंद्रासह राज्यशासनातर्फे पर्यावरण संतुलनासाठी विविध योजना राबविल्या जातात. मागील वर्षी राज्यशासनाने जिल्ह्याला 20 लाख 89 हजार तर यावर्षी 42 लाख 43 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले आहे. दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे महत्वाचे आहेच परंंतु वृक्ष संवर्धन करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. तरच पर्यावरण संतुलित राहिल. अन्यथा पर्यावरणाअभावी अनेक नैसर्गिक प्रश्न निर्माण होतील.

पर्यावरणाचे संतुलन राखले गेले पाहीजे असे शब्द सहज आपल्या कानावर अनेकदा पडतात. पण त्याचा कोणी आत्मीयतेने खरोखरच विचार केला आहे का? राज्य शासन ग्रामसमृध्दी योजनेंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कोट्यावधी वृक्ष लागवडीची घोषणा करते. प्रशासकीय पातळीवर प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दीष्टे दिले जाते.

पण प्रत्यक्षात कागदोपत्री वृक्ष लागवड दाखवुन पर्यावरण संतुलनाच्या गप्पा ठोकल्या जातात. यात केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही. सध्या ग्लोबलायझेशनमुळे हवामानात मोठे बदल होतांना दिसुन येत आहे. हवामानातील बदल हा जागतीक तापमान वाढीमुळे होणारा सर्वात चिंताजनक परीणाम आहे. जागतीक तापमान वाढ थांबवायची असेल तर वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड कमी करावा लागेल.

हा कार्बनडाय ऑक्साइड कमी करण्यासाठी झाडं लावणेच नव्हे तर झाडं जगवणे हा एकमेव पर्याय आहे. मागीलवर्षी 20 लाख 89 हजार उद्दीष्ट दिले असतांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी उद्दीष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड केल्याचा दावा केला होता. मात्र लावण्यात आलेले वृक्ष जगले कीती हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. त्यामुळे उद्दीष्ट पूर्ण करण्याबरोबरच वृक्ष संवर्धन करणेही आजमितीला काळाची गरज ठरली आहे.

प्लास्टिकबंदीमुळे र्‍हास रोखण्यास मदत

पर्यावरणात मानवी हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. हा समतोल राखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाने पुढकार घेतलेला आहे. पर्यावरणा र्‍हास रोखण्यासाठी राज्यशासनाकडून संपूर्ण राज्यात प्लास्टिकवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे काही प्रमणात का होईना. निसर्गाचा होणारा र्‍हास रोखण्यास निश्चितच मदत होणार आहे.

रासायनिक खतांचा वापर टाळा

शेतकरी जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी पूर्वी सेंद्रिय खतांचा वापर करतात. परंतु कालांतराने रासायनिक खतांचा वापर अधिक प्रमाणात होवू लागत असल्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होत आहे. त्यामुळे शेताचा पोत देखील खराब होत चालला आहे. सेंद्रिय खतांचा वापर वाढवून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शासनाने रासायनिक खतांच्या किंमती वाढविल्या आहे. जेणे करुन शेतकरी महाग असलेली खते न वापरता सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करुन आपला विकास व निसर्गाचा समतोल राखू शकतील.

दीपनगर प्रकल्पामुळे तापमानात वाढ

संपुर्ण भारतात एकुण भु भार्गांपैकी 19 टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. परंतु बेसुमार वृक्षतोड झाल्यामुळे जंगले देखील ओस पडलेली दिसून येत आहे. तसेच दिपनगर येथील औष्णिकविद्युत केंद्रात वृक्ष लागवड करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. परंतु शासनाच्या आदेशाला हरताळ फासत नियमांची पायमल्ली केली जात आहे. याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होवून परिसरात तापमानवाढीस एका प्रकारे हातभार लागत आहे.

LEAVE A REPLY

*