जामनेरच्या न्यु इंग्लिश स्कूलच्या दोघा मुख्याध्यापकांची पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रार

0
जामनेर |  प्रतिनिधी  :  शैक्षणिक हब म्हणुन अवघ्या महाराष्ट्रात नाव लौकीक असलेल्या जामनेर तालुका एज्युकेशन संस्था संचलित न्यु इंग्लिश स्कुल या शाळेत संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचेत असलेला वाद काही केल्या मिटायला तयार नाही.

याचा परिणाम मुख्याध्यापकाच्या एकाच पदावर दोन मुख्याध्यापक दि. १४/६/२०१७ पासुन विराजमान झाले आहे. हे दोघे मुख्याध्यापक एकमेका शेजारी खुर्ची टाकुन मीच मुख्याध्यापक म्हणुन दोघेही दावा करतात.

दररोज दोघांमध्ये वाद होत असुन आज अखेर मुख्याध्यापक बी आर वले व दुसरे मुख्याध्यापक डी एस पाटील या दोघांनी एकमेकांविरुध्द पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यामुळे संस्था चालकांमध्ये सुरु असलेला राजकीय वाद आता मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांचे पर्यंत गटबाजीच्या रुपाने येवुन ठेपला असुन यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल काय? अशी भिती आता पालकांना वाटू लागली आहे.

संस्थेचे अध्यक्ष आबाजी नाना पाटील यांनी मुख्याध्यापक पदी डी एस पाटील यांची नियुक्ती यापुर्वीच केलेली आहे. मात्र संस्थेचे सचिव सुरेशचंद्र धारीवाल यांनी कायदा व घटनेचा आधार घेऊन मुख्याध्यापक डी एस पाटील यांची बदली केली व त्यांचे जागी बी आर वले यांची नियुक्ती केली.

मात्र अध्यक्षांच्या नियुक्तीने बसलेले डी एस पाटील हे कार्यकारी मंडळाचा बदली आदेश न मानता आपल्या खुर्चीला चिकटून आहेत. त्यामुळे या शाळेत दोन मुख्याध्यापक आहेत. हे दोघेही मुख्याध्यापक पदावर दावा करीत असल्याने शाळेत कार्यरत असलेल्या लिपीकांनी कार्यालयीन कागदपत्रांवर व दाखल्यांवर कुणाच्या सह्या घ्यावा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दोघे मुख्याध्यापकांमध्ये बेबनाव वाढत चालला असुन दररोज काहींना काही कारणावरुन दोघे दररोज हमरी तुमरीवर येऊन भांडत असतात. काल दि. २२ रोजी मुख्याध्यापक डी एस पाटील यांनी बी आर वले विरुध्द तक्रार देवून प्रशासकीय कामात अडथळा आणीत असल्याचे म्हटले आहे.

तर आज दि. २३ रोजी मुख्याध्यापक बी आर वले यांनी डी एस पाटील व संचालक दिलीप महाजन व जितेंद्र बाबुराव पाटील हे माझेवर दडपण आणुन धमकावतात मला कामकाज करु देत नाही अशा स्वरुपाची तक्रार दिली

त्यामुळे दोघा मुख्याध्यापकामधंील वाद वाढत चालला असुन शिक्षण विभाग यातून काय मार्ग काढेल याकडे आता सार्‍यांचे लक्ष लागुन आहे.

LEAVE A REPLY

*