टपाल खात्याद्वारे धनवृद्धी

0
आपले गुंतवणुकीचे उद्दिष्ट निश्चित करून निश्चित परतावा देणार्‍या योजनांमध्ये किमान काही रक्कम गुंतवण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. अशावेळी टपाल खात्याच्या काही योजना महत्त्वाच्या ठरतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली एससीएसएस ही योजनाही चांगली ठरते.

ज्या लोकांना जोखीम घेण्याची इच्छा नसते आणि सरासरी परताव्याहून थोडा अधिक परतावा मिळाला तरी जे समाधानी असतात त्यांच्यासाठी एनएससी हा आदर्श गुंतवणूक पर्याय आहे. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचे हे चांगले उत्पादन असून मुलांचे शिक्षण आणि लग्न यांसारख्या विशिष्ट हेतूंसाठी निधी जमा करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. एनएससींमधील गुंतवणुकीवर दरवर्षी मिळत असलेले व्याज तुम्ही काढून घेऊ शकत नाही.

त्यामुळे तेही एनएससींमध्येच ठेव म्हणून ठेवले जाते. अशाप्रकारे पुनर्गुंतवणूक करण्यात आलेले हे व्याज म्हणजे नवीन गुंतवणूक असल्याचा दावा करून सेक्शन 80 सी अंतर्गत परिपक्वतेपूर्वीच्या आगामी आणखी चार वर्षांसाठीही करलाभ मिळवणे शक्य असते. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी 1500 रुपये व्याज मिळाले असेल आणि दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी अनुक्रमे 1600 आणि 1700 रुपये व्याज मिळाले तसेच चौथ्या वर्षी 1800 रुपये व्याज मिळाले तर तुम्ही या रकमा संबंधित प्रत्येक आर्थिक वर्षात एनएससींमधील नवीन गुंतवणूक असल्याचे दाखवू शकता आणि सेक्शन 80 सी अंतर्गत करलाभाचा दावा करू शकता. आपल्या प्राप्तिकर परताव्यांचे अर्ज भरताना सेक्शन 80 सी अंतर्गत केलेली गुंतवणूक म्हणून ही रक्कम दाखवून तुम्ही कपातीचा दावा करू शकता. पाचव्या वर्षी मिळवलेले व्याज मात्र गुंतवणूक म्हणून दाखवता येत नाही कारण पाचवे वर्ष संपल्यानंतर ते तुम्हाला दिले जाते.

परिपक्वतेच्या वेळी एकगठ्ठा रक्कम मिळवण्याऐवजी आपल्या गुंतवणुकीवर मासिक उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्किम म्हणजेच पीओएमआयएस हा पर्याय योग्य ठरेल. या योजनेची आणि सीनियर सिटीझन्स सेव्हिंग्ज स्किम किंवा एससीएसएसची संकल्पना एकच आहे. एससीएसएसच्या नावातून सूचित होते त्याप्रमाणे ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे.

मात्र पीओएमआयएस ही योजना प्रत्येकासाठी आहे. दोन्ही योजनांचा हेतू हा परिपक्वतेच्या वेळी गुंतवणूकदारांना मोठी एकगठ्ठा रक्कम देण्याऐवजी गुंतवणुकीच्या कालावधीत उत्पन्नाचा नियमित ओघ पुरवणे हाच आहे. या योजनेत गुंतवणूक करताना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला नियमित उत्पन्न मिळावे हा हेतूच बाळगलेला असतो. दर महिन्याला निश्चित वार्षिक दराने व्याजाची रक्कम मिळते आणि परिपक्वतेनंतर मुद्दलाची रक्कम परत केली जाते. व्याजदर दर तिमाहीला जाहीर केला जातो.

जाहीर झालेला नवीन दर योजनेच्या संपूर्ण मुदतीसाठी लागू होतो. प्रत्येक तिमाहीत जाहीर करण्यात येणारा दर हा सरकारी रोख्यांवरच्या तत्कालीन व्याजदराहून 0.25 टक्के अधिक असतो. किमान गुंतवणुकीची रक्कम 1500 रुपये असून 1500 च्या पटीतील अधिक रकमेचीही गुंतवणूक करता येते. तुम्ही एकाच नावावर खाते उघडले असेल तर गुंतवणूक रकमेची कमाल मर्यादा 4.5 लाख रुपये आहे.

संयुक्त खाते (जॉईंट अकाऊंट) असेल तर ही मर्यादा 9 लाख रुपये आहे. पीओएमआयएस योजनेतून मुदतपूर्व पैसे काढून घेता येत नाहीत. एक वर्षानंतर आणि तीन वर्षे पूर्ण होण्याआधी तुम्ही खाते बंद करू शकता. अशावेळी ठेवीच्या रकमेच्या दोन टक्के एवढा दंड आकारला जातो. तीन वर्षांनंतर परंतु परिपक्वतेपूर्वी खाते बंद करायचे असेल तर एक टक्का दंड आकारला जातो. पीओएमआयएसमधली गुंतवणूक करलाभ मिळवून देत नाही. तुम्हाला मिळालेल्या मासिक व्याजावर स्रोताच्या ठिकाणीच कर कापून घेतला जात नसला तरी हे व्याज म्हणजे तुमचे उत्पन्न समजले जाते आणि तुम्ही ज्या करपात्र वर्गात येता त्यानुसार त्यावर कर भरावाच लागतो. टपाल कार्यालयाच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदाराला मुलगी असावी लागते आणि तिच्या वयाच्या 18 वर्षांपर्यंतच गुंतवणूक करता येते. ही योजना परताव्याच्या दृष्टीने चांगली आहेच परंतु वर दिलेल्या योजना कोणालाही केव्हाही निश्चित, स्थिर उत्पन्न मिळवून देतात.

‘एससीएसएस’चे उच्चतर परतावे
सरकारने 2004 च्या ऑगस्टमध्ये सीनियर सिटीझन्स सेव्हिंग्ज स्किम (एससीएसएस म्हणजेच ज्येष्ठ नागरिक बचत योजना) सुरू केली. ज्येष्ठ नागरिक या योजनेत एकगठ्ठा रक्कम गुंतवू शकतात आणि त्रैमासिक व्याज मिळवू शकतात. परिपक्वतेनंतर मूळ रक्कम त्यांना परत दिली जाते. साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही निवासी भारतीय नागरिक एससीएसएसमध्ये गुंतवणूक करू शकतो.

स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणारी (व्हीआरएस/स्पेशल व्हीआरएसअंतर्गत) आणि 55 ते 60 वर्षांदरम्यान वय असलेली व्यक्ती एससीएसएसमध्ये गुंतवणूक करू शकते. निवृत्तीनंतर नियमित, स्थिर उत्पन्न ओघाच्या शोधात असलेले ज्येष्ठ नागरिक या पर्यायाचा विचार करू शकता. पीओएमआयएस, एनएससी, पीपीएफ इत्यादींच्या तुलनेत एससीएसएसमधील गुंतवणुकीत उच्चतर परतावे मिळवून देतात. या योजनेत 15 लाखांपर्यंत रक्कम
गुंतवता येते.
– महेश देशपांडे

LEAVE A REPLY

*