जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

0
जळगाव । जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. परंतु रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने रुग्णांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहे. तर रुग्णांना पिण्यासाठी बाहेरुन पाण्याची खरेदी करावी लागत आहे. जिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या भोंगळ कारभाराकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयाकडे हस्तांतरीत झाले आहे. यावर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात 100 जागांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असल्याने रुग्णालयाचा कायापालट होणार आहेे.

परंतु रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णालाच्या परिसरात भटकंती करावी लागत आहे. रुग्णालय प्रशासनातर्फे रुग्णालयात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी कुलर्स ठेवण्यात आले आहे. परंतु याठिकाणावरचे कुलर्स हे बंदस्थितीत आहेत तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जागा तयार करण्यात आलेली आहे. मात्र त्याठिकाणी कोणतीच साधनसामुग्री नसल्याचे चित्र जिल्हासामान्य रुग्णालयात दिसून येत आहे.

पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट
जिल्हासामान्य रुग्णालयात सेवालयाच्या बाजूला संत बाबा गरिबदास पाणपाई आहे. तर रुग्णालयाच्या आवारात रतनलाल बाफना यांच्या नावाने पाणपोई बांधण्यात आलेली आहे. तर आ. राजूमामा भोळे यांनी स्वखर्चातून पाण्याचे एटीएम रुग्णालयाच्या आवारात सुरु केले आहे. दरम्यान रुग्णासाठी नातेवाईकांना रुग्णालयाच्या आवारात जावून पाणी आणावे लागत आहे.

रुग्णांना आर्थिक भुर्दंड
जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. दरम्यान दाखल झालेल्या रुग्णांना पिण्यासाठी पैसे खर्च करुन पाणी विकत आणावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याबाबत वारंवार अधिकार्‍यांकडे तक्रार करुन देखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार रुग्णालयात दिसून येेत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात होता.

LEAVE A REPLY

*