सीईओंवर गुन्हा दाखल न झाल्यास एसपींवर कारवाई करा!

0
जळगाव । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी महिला व बालविकास अधिकारी रफीक तडवी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सीईओ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा पोलीस अधिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी विविध आदीवासी संघटनांतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.

सीईओ शिवाजी दिवेकर यांनी काही दिवसांपूर्वी बालविकास अधिकारी तडवी यांना दालनात बोलावून शिवीगाळ करुन अपमानजन्य व्यवहार केला होता. यावरुन तडवी यांनी विभागीय आयुक्तांकडे तसेच पोलीसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली होती. मात्र पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने विविध आदिवासी संघटनांनी जिल्हाभरात प्रशासनाला निवेदन दिले.

यानंतर आज पुन्हा जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात येऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी बालविकास अधिकारी रफीक तडवी यांसह आदिवासी विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष जफरुल्ला जमादार, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक मुकूंद सपकाळे, अल्पसंख्याक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष जहाँगीर खान, नगरसेवक राजू मोरे, आदिवासी तडवी उन्नती समाज मंडळाचे अध्यक्ष सुलेमान तडवी, सचिव खुर्शिद जमादार आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी
याप्रकरणी सीईओ शिवाजी दिवेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली असताना देखील गुन्हा दाखल करण्यात येत नाही. याअगोदर एका सदस्या पतीवर शिवीगाळ प्रकरणी लागलीच गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली जात असून सीईओ यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस अधिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे बालविकास अधिकारी रफीक तडवी यांनी केली आहे.

अकलाडे यांचा निषेध
याप्रकरणात जि.प. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे यांनी सीईओ यांची पाठराखण केल्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला. तसेच अकलाडे यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पोलिसांनी नोंदविले जाबजबाब
याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात बालविकास अधिकारी रफीक तडवी यांना पाचारण करण्यात येऊन त्यांच्याकडून घडलेल्या घटनेचे जाबजबाब नोंदविण्यात आले आहे. तसेच याप्रसंगी सीईओ यांच्या दालनात उपस्थित असलेल्यांविषयी माहिती घेतली. याप्रसंगी एसीईओ संजय मस्कर, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी सदस्य आर.जी. पाटील यांसह काही सदस्य उपस्थित होते. त्यांचेही उद्या जाबजबाब नोंदविण्यात येणार आहे.

जि.प.त पोलीसांची हजेरी
दरम्यान सीईओ शिवाजी दिवेकर यांचे जबाब नोंदविण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे एपीआय जानकर यांनी सायंकाळी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. मात्र याप्रसंगी सीईओ उपस्थित नसल्यामुळे त्यांना माघारी परतावे लागले.

LEAVE A REPLY

*