शहरासाठी आयुक्तांनी काय केले – मिलिंद सपकाळे यांचा महासभेत सवाल

0

जळगाव | प्रतिनिधी :  मनपा आयुक्त जीवन सोनवणे हे दि.३० जून रोजी निवृत्त होणार आहे. त्यामुळे त्यांना मुदत वाढ मिळावी, असा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला. यावर नगरसेवक मिलिंद सपकाळे यांनी ठरावाला विरोध करुन आयुक्तांनी शहरासाठी काय केले? असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, दोन वर्ष मुदत वाढीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

मनपाची महासभा महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर ललित कोल्हे, उपायुक्त जीवन सोनवणे, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते.

मनपा आयुक्त जीवन सोनवणे हे निवृत्त होत असल्याने आणि हुडको कर्ज, गाळेप्रकरण प्रलंबित असल्याने त्यांना पुन्हा दोन वर्ष सेवाकाळ मिळण्यासाठीचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला.

यावर चर्चा करतांनाच मनसेचे नगरसेवक मिलिंद सपकाळे म्हणाले की, आयुक्त जीवन सोनवणे यांनी शहरासाठी काय केले. काहीतरी शहराचा फायदा केला का? तर मग हा ठराव का करता? सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवकांना आव्हाण देत मिलिंद सपकाळे यांनी मनपा खंडातून आयुक्तांनी कोणती कामे केलीत अशी विचारणा केली.

मात्र एकही नगरसेवक उत्तर देवू शकले नाही. त्यामुळे मुदत वाढीच्या ठरावाला मिलिंद सपकाळे यांनी विरोध केला. दरम्यान, बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करण्यात आला.

नगरसेविका आशाताई कोल्हे, आरुषी पायघण यांचा सत्कार

पोटनिवडणूकीत बिनविरोध निवड होवून नगरसेविका आशाताई कोल्हे या प्रथमच सभागृहात उपस्थित झाल्या. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच १० वी सीबीएससी परिक्षेत राज्यातून प्रथम आल्याबद्दल आरुष पायघण हिचा अभिनंदनाचा ठराव करुन महापौरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी आरुष हिने यशाचे श्रेय आई-वडील, शाळा आणि जळगावकरांना दिले.

गोंधळातच महासभा सुरु

महासभा सुरु होताच उत्कर्ष मतीमंद विद्यालयाला भोईटे शाळेची इमारत देण्याच्या मुद्यावरुन भाजप नगरसेवकांचा गोंधळ सुरु होता. दरम्यान, या गोंधळातच महापौरांच्या सुचनेवरुन विषय पत्रिकेवरील विषयांना मंजूरी दिली.

आकाशवाणी चौकास डॉ.आचार्य तर प्रभातला बहिणाबाई चौक नामकरणाचा ठराव

एम.जे.कॉलेज ते स्वातंत्र चौकापर्यंत महाराणा प्रताप सिंह चौक असे नामकरण झाले आहे. त्यामुळे प्रभात चौकाला बहिणाबाई चौक तर आकाशवाणी चौकास डॉ.अविनाश आचार्य यांचे नाव देण्याबाबतचे हे दोन्ही ठराव महासभेत एकमताने मंजूर करण्यात आलेे.

 

टीडीआर प्रकरणी संबंधित वकीलांची सनद रद्द करावी

टीडीआर गैरव्यवहार प्रकरणी सहभागी असलेले सरकारी वकील ऍड.केतन ढाके आणि ऍड.गुणाले यांची सनद रद्द करावी, आणि त्याबाबत बार कॉन्सीलकडे कार्यवाहीसाठी पाठपुरावा करावा, असा ठराव कैलास सोनवणे यांनी मांडला. हा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला.

पाणी पुरवठा अभियंत्यांना खडसावले

हरीविठ्ठलनगरमधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा वितरीत होत नाही. जलवाहिनीची दुरुस्ती करण्यास सांगितल्यावर साहित्य आणून द्या? असे अधिकारी सांगत असल्याचा आरोप नगरसेविका पार्वताबाई भिल यांनी केला.

त्यावर संतोष पाटील यांनी देखील पाणी पुरवठा अयिभंता डी.एस.खडके यांना धारेवर धरुन ड्राय डे ला पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. दरम्यान, बंटी जोशी यांनीही पाण्याच्या नमून्याचे अहवाल का प्राप्त झाले नाहीत? असा सवाल उपस्थित करुन पाणीपुरवठा अभियंत्यांना चांगलेच खडसावले.

तत्कालीन आयुक्तांचे सर्व आदेश रद्द

तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी वेळोवेळी काढलेले सर्व आदेश रद्द करावे, आणि त्या संदर्भात पुढील कार्यवाही करावी, असा ठराव सुनिल महाजन यांनी मांडला. हा ठराव मंजूर करण्यात आला.

अधिकारी दाद देत नाही

वाघुर धरणावरील विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने गेल्या १५ दिवस आधी शहरात पाणी टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शंकरआप्पानगरमध्ये असलेल्या जिवंत विहीरीतून गाळ काढण्यासाठी अधिकार्‍यांना सांगितले. मात्र अधिकार्‍यांनी दाद दिली नसल्याचे नगरसेवक अमर जैन यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

पुरावे देण्याची अश्‍विनी देशमुख यांची तयारी

प्रभाग क्रमांक ३६ च्या संदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. गेल्या दोन महासभांपासून प्रोजेक्टर लावण्याची मागणी करीत आहेत. प्रोजेक्टर उपलब्ध करुन दिल्यास पुरावे देणार असल्याचे नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांनी सांगितले.

यावर महापौर नितीन लढ्ढा यांनी नि:पक्षपणे चौकशी करण्यासाठी शासनाचे विभागीय चौकशी अधिकारी यांची नेमणूक करण्याचे आश्‍वासन दिले.

दरम्यान, अश्‍विनी देशमुख यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना विरोध आहे असे सांगून रजा नोंदवून घ्या! असे म्हणत सभागृहात निघून गेल्या.

LEAVE A REPLY

*