Type to search

# Blog #निवडणूक मनपाची, परीक्षा मात्र धुळेकरांची!

maharashtra आवर्जून वाचाच धुळे ब्लॉग

# Blog #निवडणूक मनपाची, परीक्षा मात्र धुळेकरांची!

Share

 महानगरपालिकेच्या निवडणूकीमुळे धुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विकासाचा मुद्दा बाजूला पडला असून शहरातील गुंड आणि गुंडगिरी या मुद्यावरच राजकीय धृ्रवीकरण झाले आहे.

‘गुंडगिरी’ हाच निवडणूकीचा प्रमुख मुद्दा बनला आहे. या मुद्दयावर धुळ्यातील एकही राजकीय पक्ष आपले वेगळेपण सिध्द करू शकत नाही ही वास्तविकता आहे. धुळ्यातील राजकारण आणि गुंड हे समिकरणच बनले आहे. भांग, बनावट दारू, मटका, डांबर, गॅस, रॉकेल, जुगाराचे क्लब, कत्तलखान्यात कत्तलीसाठी जनावरे पाठविणे यासह अनेक अवैध धंदे करणारे खादी घालून प्रतिष्ठीतांच्या भुमिकेत वावरत आहे.

धुळेकरही आपल्या वैयक्तीक मदतीला धावून येतात म्हणून अशा प्रवृत्तींच्या लोकांना आपले नेते मानत असल्याने या अवैधधंदे करणार्‍या गुंडांना राजाश्रय प्राप्त झाला आहे. पक्ष कोणताही असो या तथाकथित राजकीय गुंडांशिवाय सत्तेचा सोपान गाठता येणार नसल्याने सर्वांनाच ते हवेहवेशे वाटतात. धुळ्याचे राजकारण स्वच्छ करावयाचे असेल तर आताच संधी आहे आणि म्हणूनच निवडणूक मनपाची असली तरी खरी परीक्षा धुळेकरांचीच राहणार आहे.

गुंडगिरीच्या नावाने धुळ्याचे राजकारण राज्यभरात बदनाम झाले आहे. तारूण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच धुळ्यातील 90 टक्के तरूणाईला पांढर्‍या शुभ्र खादी आणि लेनीनच्या वस्त्राचे आकर्षण दिसून येते. खान्देशातील कुस्तीगिरींचे माहेर असलेल्या धुळ्यातील बलदंड मल्लांनी राज्यात कुस्त्यांचे आखाडे गाजविले. मात्र, गेल्या दोन दशकांपासून कुस्त्यांपेक्षा धुळ्यात राजकीय आखाडेच जास्त गाजवू लागले आहेत.

 

धुळ्यातील गुंडगिरी ही संघटीत नाही. या गुंडगिरीला नियंत्रण करणारा कुणी मोर्‍हक्या नाही. काही अपवाद वगळले तर धुळ्यातील ज्या ‘गुंडा’वरून राजकारण तापले आहे ते मुळात अवैध व्यवसाय करणारेच आहेत. अवैध व्यवसायातील स्पर्धेने गुंडगिरीचे स्वरूप धारण केले आहे. अवैध धंद्यातून प्रचंड पैसा मिळत असल्याने खादी परिधान करत या गुंडांनी आपआपला परिसर आणि धंदा वाटून घेतल्याचे धुळ्यात चित्र आहे.

अवैध धंद्याला संरक्षण मिळावे म्हणून आपआपल्या परिरातील नागरिकांना पाहिजे ती मदत करण्यासाठी ही मंडळी तत्पर असते. मदतीच्या या ओझ्याखाली दबलेल्या सामान्य धुळेकरांसाठी ही सर्वमंडळी आपले तारणहार वाटू लागली आहेत. माझ्यामुळेच आपला परिसर सुरक्षित आहे ही भावना नागरिकांच्या मनात बिंबविण्यात यश आल्यामुळे या गुंडांची राजकीय ओळख निर्माण झाली आहे.

काही परिसराचा अपवाद वगळता बहुसंख्य धुळ्यात अवैध धंदेवाल्यांचाच शब्द प्रमाण मानला जात असल्याचे चित्र आहे आणि म्हणूनच धुळे मनपाच्या निवडणूकीत ‘गुंडगिरी’ हाच प्रमुख मुद्दा बनला आहे. या राजकीय गुंडांच्या मदतीने अनेकांना सत्ता काबिज करण्याचे स्वप्न पडू लागली आहेत. तर या गुंडांमुळे भविष्यातील राजकीय गणिते बिघडणार म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्याची हीच संधी असल्याचे अनेकांना वाटत आहे.

मुळात सामान्य धुळेकर नागरिक संभ्रमावस्थेत आहे. अडचणीच्या वेळी धावून येणार्‍या खादीतील गुंडांनाच तो आपला नेता मानू लागला आहे. गेल्या दोन दशकात हे चित्र अधिकच गडद होत गेल्यामुळे धुळ्यात राजकीय नेता बनण्यासाठी ‘अवैध व्यवसायीक’ असणे ही जणू एक पात्रताच बनल्याचे चित्र आहे. अवैध व्यवसायिकांना मिळणार्‍या सामाजीक प्रतिष्ठेला धुळ्यातील तरूणाई आदर्श मानत असून याच दिशेने वाटचाल करण्यासाठी उत्सुक दिसत आहे.

ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास धुळ्याचे भविष्य अंधःकारमय असल्याचे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिष्याची गरज नाही. उद्याचे भविष्य सुरक्षीत करावयाचे असेल तर धुळेकरांसाठी आगामी 20 दिवस महत्वाचे आहेत. या 20 दिवसात धुळेकरांना नेता, गुंड आणि गुंडगिरी याची व्याख्या अधोरेखीत करावी लागणार आहे. वैयक्तीक लाभाचा विचार सोडून धुळ्यााचे हित कशात आहे हे ओळखावे लागणार आहे. म्हणूनच निवडणूक मनपाची असली तरी खरी परीक्षा ही धुळेकरांचीच ठरणार आहे.

एक गठ्ठा मतांचे गणित जोडण्यासाठी कोणताच राजकीय पक्ष गुंडांना बाजूला करू शकत नाही हे राजकारणातील वास्तव आहे. म्हणूनच गुंड या शब्दाची व्याप्ती वाढवून अवैध व्यवसायीक आणि गुंड हे एकाच नाण्याचा दोन बाजू असल्याचे ओळखून यासर्वांना मतदानातून त्यांची जागा दाखविली तरच भविष्यात धुळ्यात बदलाचे वारे वाहतील आणि राजकीय पक्षही गुंडांपासून चार हात लांबच राहतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!