प्रभू सियावर रामचंद्र की जय..!

रथाचे दर्शन घेण्यासाठी पंच क्रोशीतून भाविकांची मांदियाळी; परिसराला यात्रेचे स्वरुप

0
जळगाव ।  प्रतिनिधी :  प्रभू सियावर रामचंद्र की जय, राम राम जय श्री राम, रामचंद्र हनुमान की जय अशा गगनभेदी जयघोषात सनई, चौघड्याच्या निनादात कार्तीकी एकादशीनिमीत्त श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथोत्सव मोठ्या चैतन्यमय वातावरणात पार पडला. रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची सकाळपासूनच मांदियाळी होती. त्यामुळे रथोत्सवाच्या मार्गाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होवून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. रथावर दुपारच्या सुमारास वरुणराजाने बरसून रथाचे जोरदार स्वागत केले.

जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्री राम मंदिर संस्थांतर्फे कार्तीकी एकादशीनिमीत्त श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी पहाटे 4 वाजता काकडा आरती व प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला.

त्यानंतर सकाळी 10.30 वाजता श्री राम मंदिर संस्थांनचे विश्वस्त गादीपती हभप श्री. मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात रथाची व उत्सवमुर्तीची महापुजा करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे, महापौर सिमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. उज्वला पाटील, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, माजी महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्ता शिंदे, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, सुभाष चौक पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत खटोड, माजी महापौर विष्णू भंगाळे, पिपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, अ‍ॅड. सुशिल अत्रे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, नगरसेवक डॉ.विश्वनाथ खडके, सुनिल खडके, राजेश यावलकर उपस्थित होतेे.

यावेळी श्रीराम मंदिर संस्थांनतर्फे मान्यवरांसह रथाला मोगरी लावणार्‍यांचा उपरणे देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 1.10 मिनीटांनी रथाची महाआरती होवून प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर शहरात जूने जळगाव, सराफ बाजारातील महालक्ष्मी मंदिर, बालाजी मंदिरात पानसुपारीचा कार्यक्रम होवून रात्री 12 वाजता प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीला पाखली ठेवून वाजत गाजत त्याची महाआरती होवून श्री राम रथोत्सवाची सांगता करण्यात आली.

रथाला 146 वर्षाची परंपरा

वारंकरी संप्रदायाचे कान्देशातील थोर संत व श्रीराम मंदिर संस्थानचे मुळ सत्पुरुष श्री अप्पा महाराज यांनी सन 1872 साली हिंदू समाजातील अठरा पगड जाती, एकत्र करून हया रथोत्सवाच्या सोहळयाला प्रारंभ केला होता. 146 वर्ष पूर्ण झाली असून जळगावकरांच्या असंख्य भाविकांच्या सहकार्याने हा रथोत्सव नंदादिप अखंडपणे तेवत आहे.रथोत्सवाकरिता अवघ्या महाराष्ट्र भरातून असंख्य भाविक प्रभु श्रीरामांच्या दर्शनसाठी जळगावात येत असल्याने जळगावाला प्रतिपंढरपुरचे स्वरुप प्राप्त होत असते.

कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला निघणारा जळगावच्या श्रीराम मंदिर संस्थानचा एकमेव रथोत्सव असून या रथोत्सवाला 145 वर्षांची अखंड परंपरा लाभली असल्याचे श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा मंदिराचे पाचवे वंशज हभप. मंगेश महाराज जोशी यांनी सांगितले.

पंचक्रोशीतून भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी

भगवे ध्वज, झेंडू, शेवंती अन गुलाबांच्या फुलांच्या माळा, आंब्यांच्या पानांचे तसेच नारळांचे तोरण, आकर्षक रोषणाई, केळीचे खांब अन ऊसाची मोळी लावून रथ सजविण्यात आला होता. तसेच सजलेल्या भव्य-दिव्य रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच रात्री उशीरापर्यंत गर्दी केली होती.

पंचक्रोशीतून भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी

भगवे ध्वज, झेंडू, शेवंती अन गुलाबांच्या फुलांच्या माळा, आंब्यांच्या पानांचे तसेच नारळांचे तोरण, आकर्षक रोषणाई, केळीचे खांब अन ऊसाची मोळी लावून रथ सजविण्यात आला होता. तसेच सजलेल्या भव्य-दिव्य रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच रात्री उशीरापर्यंत गर्दी केली होती.

जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस अधिक्षकांनी ओढला रथ

ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे काढण्यात आलेला प्रभू श्रीरामचंद्राचा रथाची विधीवत पुजा करण्यात आली. त्यानंतर रथाच्या चाकांना कोहळ्याचे फळ अर्पण करुन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे यांनी रथ ओढून रथोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांनी प्रभूश्रीरामांचा गननभेदी जयघोष केला.

रथाला 80 किलो फुलांचा हार

कार्तीकी एकादशी निमीत्त निघणार्‍या रथाचे रथ मार्गस्थ जूने जळगावातील स्नेह मित्र मंडळ व थोरले मित्र मंडळातर्फे रथाला गेल्या 11 वर्षांखपासून पुष्पहार अर्पण केला जात आहे. यंदा देखील या रथाला सुमारे 80 किलोचा फुल व्यावसायिक समाधान बारी यांच्याकडून झेंडुची दोन रंगातील फुले, शेंवती, अष्टरच्या फुलांचा हार अर्पण करण्यात आला. तसेच ठिकठिकाणी चौकाचौकांमध्ये मंडळांकडून पुष्पवृष्टींनी रथाचे स्वागत करण्यात आले.

प्रभू सियावर रामचंद्र की जय..!

परिसराला यात्रेचे स्वरुप

कार्तीकी एकादशी निमीत्त निघणार्‍या रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक दर्शन घेण्यासाठी शहरात दाखल होत असतात. रथोत्सवानिमीत्त चौकाचौकांमध्ये खेळणे विक्रीची दुकाने थाटली असल्याने परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

वरुणराजाकडून रथाचे स्वागत

रथ मार्गस्थ होत असतांना दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास आकाशात सर्वत्र मेघ भरुन आले होते. त्यानंतर अवघ्या काही मिनीटातच पाऊसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच रथ ओढणार्‍यांकडून प्रभू श्री रामचंद्रांचा जयघोष केला होता. त्यामुळे वरुण राजाने देखील यंदा प्रभू श्री रामांच्या रथावर बरसून त्याचे स्वागत केल्याची भावना भाविक व्यक्त करीत होते.

हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या प्रभु श्रीरामचंद्राचा रथोत्सवात रथोत्सव समितीकडून रथोत्सवाचे संस्थापक श्री अप्पा महाराज यांचे परममित्र लालशाह बाबा यांच्या भिलपुरा चौकातील समाधी स्थाळावर चादर चढविण्यात आली. तर त्याठिकाणाच्या मुस्लिम समाजबांधवातर्फे रथाचे स्वागत करण्यात येत असल्याने जळगावाच्या रथोत्सवाला हिंदु-मुस्लिम समाजबांधवाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.

सोंगांची सवाद्य मिरवणुकीने वेधले लक्ष

रथोत्सवात भवानी मातेचे रुप मानल्या जाणार्‍या सोंगाकडून अध्यात्माचा प्रचार केला जात असतो. प्राचीन काळापासून वर्षानुवर्षापासून सुरु असलेल्या या लोककलेतून महिषासुरमर्दिनीच्या रुपातील सोंगाची सवाद्य मिरणवणुक काढली जाते. यात ढोल ताश्यांच्या गजरात शहरातील चौकात सोंगे नाचत होती. या सोंगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

प्रभू श्रीराम, हनुमानाच्या भव्य मुर्तींनी वेधले लक्ष

रथाच्या अग्रभागी कवियत्री बहिणाबाई मल्टी पर्पज युवा ब्रिगेडीयर्स फाऊंडेशनतर्फे सात फुटी हनुमानाची मुर्ती, जुने जळगावातील वीर जवान गु्रपतर्फे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची तर विश्वहिंदू परिषद बजरंग दलातर्फे आकर्षक प्रभू श्रीरामांची भव्य मुर्ती अग्रभागी ठेवण्यात आलेली असल्याने या मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

ढोल-ताश्याच्या तालवर धरला ठेका

रथोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर रथाच्या अग्रभागी संत मुक्ताइबाईची पालखी, सनई चौघडा, नगारा, चोघडा गाडी, बँड पथक, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ, ओम साई गु्रप भजनी मंडळांकडून भक्तीगीत व भजन सादर करीत असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच बंजरंग दलाच्या कार्यर्त्यांनी ढोल- ताशांच्या तालावर लेझिमचा ठेका धरला होता.

लहान रथाचे विशेष आकर्षण

रथोत्सवानिमीत्त शहरातून निघणार्‍या प्रभू श्रीराम चंद्रांचा रथ काढण्यात येत असतो. दरम्यान विठ्ठलपेठ रथोत्सव मित्र मंडळातील चिमुकल्यांनी सुमारे 5 फुट उंचीचा मोठ्या रथाची हुबेहुब प्रतिकृती तयार केली असून त्याची रथाच्या अग्रभागी रथाच्या मार्गावर फिरवण्यात आला. त्यामुळे रथोत्वात रथाच्या पुढे असलेले लहान रथ याठिकाणी रथोत्सवात विशेष आकर्षण ठरले होते.

LEAVE A REPLY

*