Type to search

अंत्ययात्रा घेवून जातांना लोखंडी पूल कोसळला : आठ ते दहा जणांना किरकोळ दुखापत

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

अंत्ययात्रा घेवून जातांना लोखंडी पूल कोसळला : आठ ते दहा जणांना किरकोळ दुखापत

Share

जळगाव ।  प्रतिनिधी : ममुराबाद नाल्याशेजारील दफनभुमीजवळ अंत्ययात्रा घेवून जातांना जीर्ण झालेला लोखंडी पुल अचानक कोसळल्याने झालेल्या घटनेत अंत्ययात्रेतील आठ ते दहा जणांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास तासभर विलंबाने दफनविधीचा कार्यक्रम झाला. ही घटना दुपारी 12.20 वाजेच्या सुमरास घडली.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शनिपेठेतील लिंगायत गवळी समाजामधील नारायण हरी गवळी (घुगरे) वय 59 यांचे निधन झाले असल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. दरम्यान ममुराबाद नाल्याशेजारील मोकळ्या जागेवर दफनविधी करण्यात येणार होता. यावेळी गवळी यांची अंत्यायात्रा याठिकाणी पोहचल्यानंतर नाल्यावरील लोखंडी पुल अचानक कोसळला. अंत्ययात्रेसह सोबतचे नातेवाईक नाल्याच्या पाण्यात पडले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

तिरडीसह अंत्ययात्रा देखील कोसळली

गवळी यांची अंत्ययात्रा दफनभुमीत नेतांना अचानक पुल कोसळल्याने अंत्ययात्रेसह सोबतचे सर्व नातेवाईक व कुटुंबिय नाल्यात कोसळले. यावेळी अंत्ययात्रेतील काही नागरिकांनी मृतदेह उचलून बाजूला काढला. त्यानंतर नाल्याच्या पाण्यात पडलेले सर्व नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे जवळपास तासभर उशिराने दफनभुमीत अंत्यविधी करण्यात आला.

या नातेवाईकांना झाली दुखापत

अंत्ययात्रासोबत नाल्यात पडल्याने चाळीसगाव येथील नारायण नंदु गवळी यांच्या उजव्या पायाला लोखंडी पत्रा लागल्याने गंभीर दुखापत झाली. तसेच महेश गवळी, उमेश गवळी, दिपक गवळी, अमित गवळी, आसाराम बारशे, संतोश गवळी, कुणाल गताडे, आवळाजी गवळी, किशारे गवळी, लवेश घुगरे, कृष्णा गवळी हे जखमी झाले होते.

महानगरपालिकेचे दुर्लक्ष

दफनभुमीठिकाणी ठराविक समाजातील नागरिकांचा अंत्यविधी करण्यात येत असतो. अनेक वर्षापासून या पुलाची दुरावस्था झाली होती. महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज ही घटना घडली. पुल कोसळल्याने आठ ते दहा जणांना दुखापत झाली आहे. महानगरपालिकेने पुलाची वेळीच दुरुस्ती केली असती तर ही दुर्घटना घडली नसती, या घटनेला महानगर पलिका प्रशासनच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

पुलासंदर्भात चौकशी करणार – आयुक्त

ममुराबाद नाल्याजवळील लोखंडी पुल कोसळल्याची दुर्दैवी घटना आज घडली. पुल बांधण्यासाठी कोणी परवानगी दिली, तांत्रिक मान्यता कोणी दिली या संदर्भातील सखोल चौकशी करणार असल्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले.

नाल्याचा प्रवाह बदलविल्यामुळे पुल कमकुवत

ममुराबाद रस्त्यावरील लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलवुन आणि स्लॅब टाकुन नाला रुंद करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे दोन वर्षांपासुन तक्रारदेखील प्राप्त झाली आहे. प्रवाह बदलविल्यामुळे लोखंडी पुल कमकुवत झाला असावा अशी शक्यता देखील वर्तविली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!