दोन चिमुकल्यांसह मातेची तापीत उडी : मुलाचा मृतदेह सापडला : मायलेकींचा शोध सुरू

0
चहार्डी, ता.चोपडा |  वार्ताहर :  येथील विवाहीतेने आपल्या दोन लहानग्या मुलांसह बुधगाव-जळोद येथील तापी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१८ जून रविवारी रोजी घडली.

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.मात्र या हृदय पिळवून टाकणार्‍या घटनेने चहार्डी व पंच क्रोषीत समाजमन हेलावले असून,सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.रविवारी संध्याकाळपर्यंत तिघांपैकी मुलाचा मृतदेह सापडला असून, संध्याकाळी उशिरापर्यंत मायलेकींचा शोध सुरूच होता.

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील गौतमनगर भागातील रहिवाशी सौ. अनुराधा सिद्धार्थ वारडे ( वय-२६ ), या विवाहित महिलेने आपल्या पोटाच्या कु. सिद्धी सिद्धार्थ वारडे ( वय-४ ), जयेश सिद्धार्थ वारडे (वय-पावणेदोन वर्ष)अशा दोन्ही लहानग्या मुलांसह दि. १८ जून रविवारी दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास बुधगाव-जळोद पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

तापीपुलावरून एका विवाहीत महिलेने दोन मुलासह उडी घेवून आत्महत्या केल्याच्या घटनेची बातमी बुधगाव,जळोद व चहार्डीत येऊन धडकली.लागलीच बुधगाव,जळोदच्या ग्रामस्थांनी व काही नातेवाईकांनी घटना स्थळावर येवून पोहणार्‍यांनी उड्या घेवून शोध घेणे सुरू केले.

परंतु तीनपैकी लहान असलेल्या जयेश याचे शव घटने नंतर लगेच पाण्यात वर आल्याने हाती लागले.विवाहीतेने पोटाच्या दोन मुलासह आत्महत्या का केली असावी ? याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

दरम्यान अमळनेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विकास वाघ, चोपडा ग्रामीणचे पो.स्टे.चे पोलीस स्टेशनचे एपीआय नानासाहेब दाभाडे, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार डॉ.स्वप्नील सोनवणे,हातेडचे मंडळ अधिकारी आर. के.साळुंखे,बुधगावचे तलाठी गजानन पाटील यांनी दुपारी घटना स्थळाला भेट देऊन चौकशी केली.

दुपारपासून आई व दोन्ही मुलांचा पाण्यात शोध घेण्याचे काम युद्ध पातळी वर सुरू होते. परंतु तीनपैकी आता पर्यंत जयेश याचे शव मिळून आले आहे.

मात्र सौ.अनुराधा वारडे व कु.सिद्धी वारडे या दोन्ही मायलेकींचे शव रविवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आढळून आले नाही.तसेच आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात येईल अशी माहिती चोपडा येथील नायब तहसीलदार डॉ.स्वप्नील सोनवणे, पो.नि. विकास वाघ (अमळनेर) यांनी दिली.

LEAVE A REPLY

*