चोसाका संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांविरुध्द तक्रार : धनादेश अनादर प्रकरण

0

चोपडा ।  प्रतिनिधी :  चोसाका कडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना थकीत पेमेंटचे दि.10 नोव्हेंबरच्या मुदतीचे धनादेश देण्यात आले होते परंतु चोसाकाच्या बँक खात्यात शिल्लक नसल्याने धनादेशाचा अनादर झाल्यामुळे शेतकर्‍यांना पैसे मिळाले नाहीत. निराशा होऊन देखील शेतकर्‍यांनी संयम दाखवत सोमवार पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. परंतु चोसाका संचालक मंडळा कडून आज दुपार पर्यंत पेमेंट बाबत कुठलीच हालचाल न झाल्याने अखेर सोमवारी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी एस. बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस स्टेशन गाठून चोसाकाचे चेअरमन,व्हॉईस चेअरमनसह संचालक मंडळ ,प्रभारी कार्यकारी संचालक, चीफ अकाऊंटन या सर्वांच्या विरोधात पोलीसात लेखी तक्रार दाखल केली.

चोसाका संचालक मंडळाने 2017/18 च्या गाळप हंगामासाठी काट्याखाली पैसे देऊ असे ठोस आश्वासन ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिले होते.त्यावर विश्वास ठेवून तालुक्यातील शेतकर्‍यांनी कारखान्यास ऊस दिला होता.परंतु शेतकर्‍यांना काट्याखाली पैसे मिळालेच नाहीत.या संदर्भात शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांच्यासह ऊस उत्पादकांनी रास्तारोको आमरण उपोषण,मोर्चा तसेच स्वातंत्र्यदिनी आयोजित आत्मदहन आंदोलन केले परंतु सर्वपक्षीय नेते व चोसाका संचालक मंडळा कडून आश्वासना पलीकडे काहीच शेतकर्‍यांच्या पदरी काहीच मिळाले नाही. शेवटी साखर आयुक्तांनी पुन्हा आरआरसीची कार्यवाही केली.

त्यानंतर चोसाका प्रशासनाने गेल्या महिन्यात ऊस उत्पादकांना 2 कोटी 44 लाख 32 हजार रकमेचे दि.10 नोव्हेंबर मुदतीचे बंधन बँकेचे धनादेश दिले. शेतकर्‍यांनी धनादेश क्लिअरिंगसाठी बँकेत जमा केला परंतु चोसाकाच्या बँक खात्यात शिल्लकच नसल्याने शेतकर्‍यांचे धनादेश बाऊन्स झाले म्हणजे वटले नाहीत तरी देखील संचालक मंडळास ऊस उत्पादकांनी दि.19 नोव्हेंबर सोमवार पर्यंतचा अल्टीमेटम दिला आठ दिवसाची मुदत देऊन सुद्धा आज पर्यंत चोसाका संचालक मंडळाने पेमेंट देणे संदर्भात कुठलीच हालचाल केली नाही म्हणून हताश झालेल्या शेतकर्‍यांनी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय गाठून तहसील दीपक गिरासे,पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची भेट घेऊन थकीत पेमेंट बाबत चर्चा केली

यावेळी तहसीलदार दीपक गिरासे यांनी चोसाका प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला परंतु त्यांना शेतकर्‍यांना पेमेंट करणे बाबत ठोस उत्तर मिळाले नाही.यावेळी संचालक मंडळाने शेतकर्‍यांची शुद्ध फसवणूक करून धूळफेक केली असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी तहसीलदार दीपक गिरासे व पोलीस निरीक्षक नजन पाटील यांच्यासमवेत तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत करण्यात आला.त्यानंतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी लेखी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

आमचा कोणत्याच संचालकाविषयी द्वेष नाही परंतु पैशाचे सोंग आम्ही करु शकत नाही तेंव्हा नाईलाजाने आम्हाला तक्रार दाखल करावी लागत आहे असे उपस्थित शेतकर्‍यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले याप्रसंगी शेतकरी कृती समितीचे एस.बी. पाटील,शिवाजी पाटील,प्रदीप पाटील,दिलीप पाटील,विजय पाटील,दिलीपसिंग सिसोदिया, भरत पाटील,दिलीप धनगर,प्रवीण पाटील, मुकुंद पाटील,प्रशांत पाटील,प्रकाश पाटील, चंद्रकांत पाटील यांचेसह आदी शेतकर्‍यांनी पोलीस निरीक्षक नजनपाटील यांना चोसाका संचालक मंडळा विरोधात लेखी तक्रार वजा फिर्याद बाबतचे लेखी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

*