बोदवड सिंचन योजनेसाठी 66 कोटींच्या वितरणाला मान्यता : ना.गिरीश महाजनांनी राज्यपालांची घेतली भेट

0
जळगाव ।  प्रतिनिधी  : तापी पाटबंधारे विकास मंडळांतर्गत असलेल्या बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या 66 कोटी 66 लाख रुपयांच्या निधीचे वितरण सुत्राबाहेर ठेवण्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे. यासंदर्भात जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांनी राज्यपालांचे आभार मानले.

जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या बोदवड परिसर सिंचन योजनेत सन 1999 मधून मंजुरी मिळाली होती. 522.20 कोटी रुपयांचे किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 2008 मध्ये 1 हजार 508.23 कोटी रुपयांचे किंमतीस दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती.

या योजनेला जल आयोगाची मान्यता असून 2178.67 कोटी ऐवढ्या रक्कमेच्या खर्चास निती आयोगाने मान्यता दिली आहे. या योजनेचे काम तातडीने सुरु व्हावे म्हणून केंद्र शासनाने 2012 मध्ये 500 कोटी रुपये एकरक्कमी मंजूर केले होते. त्यानंतर 2014-15 साठी 12.40 कोटी व 200 कोटी अशी तरतुद केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या तरतुदींपैकी एकतृतीयांश म्हणजे 66 कोटी 66 लाख रुपये केंद्र शासनाने राज्य सरकारला वितरीत केले होते.

सन 2017 च्या मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार या योजनेच्या टप्पा-1 च्या कामास सुरु करण्याची परवानगी देखील देण्यात आली होती. सन 2018 च्या पावसाळी अधिवेशनात 66 कोटी 66 लाख रुपये उपलब्ध करुन देण्याबाबत जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांनी पाठपुरावा केला होता. तसेच त्यांनी यासंदर्भात राज्यपालांची देखील भेट घेतली होती.

राज्यपाल विद्यासागर राव यांनी 66 कोटी 66 लाख रुपयांच्या निधीचे वितरण सुत्राबाहेर ठेवण्याला मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे बोदवड परिसर सिंचन योजनेचे टप्पा-1 चे काम आता लवकरच सुरु होणार आहे. या योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील 26 हजार 721 हेक्टर व बुलढाणा जिल्ह्यात 15 हजार 699 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सुमारे 20 हजार 200 हेक्टर क्षेत्र प्रवाहीपद्धतीने व 22 हजार 220 हेक्टर उपसापद्धतीने सिंचीत होणार आहे.

LEAVE A REPLY

*