संतांनाही प्रेरणा देणारी संत आदीशक्ती मुक्ताई

0
श्री क्षेत्र मेहूण येथील तापीतीरावर संत आदीशक्ती मुक्ताई शके 1219 मध्ये गुप्त झाल्या. त्या घटनेला वैशाख वद्य दशमी, गुरुवार, दि. 10 मे 2018 रोजी 721 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त संत मुक्ताईंच्या तिरोभूत (गुप्त) होण्याच्या प्रसंगाची माहिती देणारा हा लेख…

संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. जगाचा उध्दार करण्यासाठी संतांनी अवतार घेतला. याच संतांच्या मांदीयाळीत संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत आदीशक्ती मुक्ताई यांचा समावेश होतो. तत्कालिन समाजातील भेदभाव, उच्चनीचपणा दूर करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. एवढेच नाही तर ज्या संतांनी समाजसुधारणा करण्याचे कार्य केले, अशा संतांनाही प्रेरणा देण्याचे काम वयाने लहानग्या संत मुक्ताई यांनी केले.
विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्यानंतर गुरूंच्या आदेशाने रूक्मिणीशी विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना चार अपत्ये झाली. यापैकी संत मुक्ताई यांचा जन्म प्रमाधि नाम संवत्सर शके 1201 मध्ये आश्विन शुध्द प्रतिपदा नवरात्रीच्या प्रारंभीला शुक्रवार या दिवशी झाला. जन्मापासून चारही भावडांचा संन्यासाची मुले म्हणून छळ होवू लागला. छळाला कंटाळून ते कुटुंबासहीत त्र्यंबकेश्वराला गेले. तेथे निवृत्तीनाथांना एका गुहेत गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनी ते ज्ञान ज्ञानेश्वर व त्यानंतर सोपानदेव व संत मुक्ताई यांना दिले. मातापिता निघून गेल्यानंतर ही भावंडे पोरकी झाली. काही दिवस आपेगावी राहून नंतर ती आळंदीला येवून राहू लागली. परंतु तिथेही त्यांना जननिंदा सहन करावी लागत होती.

चारही भावडांची किर्ती ऐकून पैठणच्या ब्राह्मणांनी त्यांना अवतारी पुरूष असल्याचे शुध्दीपत्र दिले. तेथून नेवासे येथे गेल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी व अनुभवामृत हे ग्रंथ लिहीले. त्यानंतर पुणतांबे येथे ही भावंडे गेली. तेथे 1400 वर्षांचे योगी संत चांगदेव समाधी लावून बसले होते. त्यांच्या गुहेबाहेर प्रेतांचा प्रचंड ढिग पानांमध्ये गुंडाळून ठेवला होता. प्रेतांजवळ बसलेल्या माणसांना याविषयी विचारले असता, संत चांगदेव महाराज समाधीतून उठल्यानंतर प्रेतांवर जेव्हा एक नजर टाकतात तेव्हा ही सर्व प्रेते जिवंत होतात. हे ऐकल्यावर संत मुक्ताईंनी जवळच पडलेले एक हाड उचलले. त्यावर संजीवनी मंत्राचा उपयोग करून ते हाड एका मृत कुत्र्यावर फिरवून त्याला जिवंत केले. त्याबरोबरच तेथील सर्व प्राणीमात्रांची प्रेते संत मुक्ताईंनी जिवंत केली. त्यानंतर ही भावंडे आळंदीला निघून गेली. इकडे समाधीतून उठल्यानंतर संत चांगदेवांच्या शिष्यांनी त्यांना संत मुक्ताईदी भावंडांचा चमत्कार सांगितला. तेव्हा त्यांनी त्यांना भेटायचे ठरविले. काय लिहू व कसे लिहू या विवंचनेत त्यांनी कोरे पत्र पाठवून दिले. त्यावर संत मुक्ताई यांनी 1400 वर्ष जगूनसुध्दा अजून कोराचा कोराच आहे, असा संदेश पाठविला. त्यानंतर संत चांगदेव हे वाघावर बसून चारही भावंडांना भेटायला आले असता त्यांनी निर्जिव भिंत चालवून त्यांचे स्वागत केले. तेव्हा संत चांगदेवरायांचा गर्वहरण झाल्याने संत मुक्ताईंनी त्यांना गुरूपदेश दिला. गुरूपुत्र झालो मुक्ताईचा असे म्हणून संत चांगदेवांनी संत मुक्ताईंचा गौरव केला. धन्य ती दहा वर्षांची माता आणि चौदाशे वर्षांचे बालक.

सर्वदूर चारही भावंडांना मानू लागले. परंतु आळंदीतीलच एक कर्मठ ब्राह्मण विसोबा खेचर मात्र त्यांचा अजुनही उपहास करीत होता. एकदा संत निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाल्यावर त्यांनी संत मुक्ताईंनी कुंभारणीच्या घरून मांडे भाजण्यासाठी परळ आणण्याकरीता पाठविले. परळ घेवून येत असतांना वाटेत भेटलेल्या विसोबा खेचराने ते फोडून टाकले. उदास चेहरा घेवून आलेल्या संत मुक्ताईंना बघून संत ज्ञानेश्वरांनी आपल्या तपाच्या सामर्थ्याने पाठ तापवली व त्यावर संत मुक्ताईंनी मांडे भाजले. हे सर्व विसोबा खेचर खिडकीतून पाहत होते. त्यावेळी त्यांचा अहंकार जळून भस्म झाला. त्यांनी संत मुक्ताईंच्या पायावर लोटांगण घातले. संत मुक्ताईंनी त्यांना उपदेश करून त्यांचा उध्दार केला.

विसोबा खेचराला जसा अहंकार होता तसाच संत नामदेवांना होता. विठ्ठलाच्या जवळ राहत असल्याने त्यांना सर्व दुय्यम वाटत होते. ज्यावेळी संत ज्ञानेश्वरादी भावंडे संत नामदेवांच्या भेटीस आली त्यावेळी सर्वांनी त्यांचे दर्शन घेवून लोटांगण घातले. परंतु संत नामदेव कोणाच्याही पाया पडले नाही. तेव्हा मुक्ताईंनी अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही अशा शब्दांत त्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर पांडुरंगाच्या सांगण्यानुसार संत नामदेवांनी विसोबा खेचरांना गुरू केले. संत मुक्ताईंनी संत नामदेवरायांचा गर्वपरिहार करून त्यांचा अहंकार नष्ट केला. संतांना प्रेरणा देणार्या संत आदीशक्ती मुक्ताई शके 1219 मध्ये वैशाख वद्य दशमीच्या दिवशी महत्नगर (सध्याच्या श्री क्षेत्र मेहूण, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील तापीतीरावर 17 वर्षे, 7 महिने व 24 दिवसांच्या असतांना तिरोभूत झाल्या. या घटनेला गुरुवार, दि. 10 मे 2018 रोजी 721 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त श्री क्षेत्र मेहूण येथे तिरोभूत सोहळा साजरा होत आहे.
भुसावळ, जि. जळगाव
मोबाईल 8149498020
– डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील

LEAVE A REPLY

*