हतनूर येथे दारूबंदीसाठी सावित्रीच्या लेकी सरसावल्या

0
हतनूर, ता.भुसावळ | वार्ताहर :  येथे बेसुमार सुरू असलेल्या गावठी व देशी दारू विक्री विरोधात गावातील शेकडो महिलांनी वरणगाव पोलिस ठाणे गाठून आपली कैङ्गियत मांडली. दारूमुळे होणारे नुकसान टाळावे याकरिता सपशेल दारू बंदी करण्यात यावी, यासाठी पोनि जगदीश परदेशी यांच्यासोबत या महिलांनी ग्रा.पं. सदस्यांसह चर्चा केली.

दिड हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या हतनूरला तापी नदीचा किनारा लाभला असल्याने दरी कपारीत व नदी किनारी देशीसह गावठी दारूचे अड्डे बेमालुमपणे सुरू आहेत.

त्यामुळे परिसरातील तरूणांसह लहान मुलांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढू लागले आहे. व्यसनामुळे घराघरात भांडणे होत असल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. याबाबत तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाला निवेदन देवून यापूर्वी दारूबंदीची मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली होती.

मात्र याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने दारूविक्री करणार्‍यांची हिंमत वाढली. त्यामुळे खुलेआमपणे बसस्थानक परिसरात व गावात दारू विक्री सुरू झाली आहे.

या प्रकारावर नियंत्रण आणून पुर्णपणे दारूबंदी युक्त गाव करण्यात यावे यामागणी करिता सुमारे दिडशे रणरागिणी महिलांनी वरणगाव पोलिस ठाण्यावर आपला मोर्चा नेला.

यावेळी पोनि जगदीश परदेशी यांच्याशी महिलांनी दारूबंदीबाबत चर्चा केली. त्यानंतर पोनि परदेशी यांनी तात्काळ हतनूर ग्रा.पं.मध्ये येवून बैठक घेतली.

पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत व महिला यांच्यात झालेल्या बैठकीनंतर दारूबंदी बाबत कार्यवाही होईल का पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

तंटामुक्ती समिती कागदावरच -गावातील तंटे मिटावे या हेतुने स्थापन झालेली तंटामुक्ती समिती कोणतीच कार्यवाही अथवा बैठक घेत नसल्याने ही समिती कागदावरच असल्याचे दिसुन येत आहे.

समितीचे सचिव तलाठी असून त्यांनी आतापर्यंत याबाबत एकही बैठक घेतली नाही त्यामुळे तंटामुक्त समितीचा उपयोग काय अशा प्रकारचा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

*