अमळनेर। शहरातील शिवाजी बगीचा परिसर मध्यरात्री बंदुकीच्या आवाजाने हादरला. याच परिसरात असलेल्या बोहरी पेट्रोल पंपाचे संचालक अलीअजगर बोहरी उर्फ बाबा बोहरी (वय-50) यांच्यावर अतिशय जवळून बंदूकीतून गोळी झाडण्यात आली होती.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बाबा बोहरी रक्ताच्या थारोळ्यात पडले. सर्व ताकद एकटवून ते पुन्हा पेट्रोलपंपावर आले. रक्तबंबाळ झालेल्या मालकापाहून नोकरही भेदरले. बाबाशेठने पिण्यासाठी पाणी मागितले आणि ते कोसळले. दरम्यान, येथून जात असलेले नगरसेवक नरेंद्र संदाशिव पेट्रोलपंपावर गोंघळाची स्थिती दिसली. त्यांनी तेथे धाव घेवून जखमी बाबाशेठ यांना डॉ.निखील बहुगूणा यांच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. गोळी कुणी मारली? का मारली? किती जण होते? याबाबत काहीच माहिती नाही. दरम्यान, मध्यरात्री घडलेल्या या थराराची माहिती वार्‍यासारखी शहरात पसरली आणि संपूर्ण शहर दहशतीमुळे जागे झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील बोहरी पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना सेवा मिळत असते. पंपाचे संचालक माजी नगरसेवक बाबा बोहरी हे उशिरापर्यंत पंपावरच असतात. दररोज

11.30 ते 12 वाजेच्या दरम्यान ते पायीच शिवाजी बगीचाच्या मागील गल्लीतून ते थेट आपल्या घरी पायीच जात असत. त्यांच्या सवयीप्रमाणे ते आजही काळी पँट व पांढराशुभ्र शर्ट घालून पंपावर हजर होते.

11.45 च्या सुमारास ते पंपा रात्रपाळी कामावर असलेल्या माणसांच्या हवाली करून बाबाशेठ घरी जाण्यासाठी पायी निघाले. अर्धा कि.मी.पेक्षा जास्त अंतर बगीच्यामागील गल्लीतून गेल्यानंतर अचानक बंदूकीतून गोळी झाळल्याचा आवाज झाला. ही गोळी बाबाशेठ यांच्या छाती आणि पोटाच्या मध्यभागी अतिशय जवळून झाडण्यात आली होती. काही समजण्या आधीच गोळी शरीरात गेल्याने बाबाशेठ रक्तबंबाळ होवून खाली कोसळले. दरम्यान, आपले का करून हल्लेखोराने पोबारा केला.

जखमी बाबाशेठ यांनी सर्वशक्तीनिशी स्वत: सावरून पुन्हा पेट्रोलपंप गाठले. काही क्षणापूर्वी घरी निघालेल्या मालकाला रक्तानेमाखलेल्या रूपात पाहून पेट्रोलपंपवर काम करणार्‍या माणसांची भंभेरीच उडाली. दरम्यान, जखमी बाबाशेठ यांनी या माणसांकडे पाणी मागितल्याचे त्यांच्या भावाने सांगितले. पंपावरील दहशतीचे वातावरण पाहून रस्त्यावरून जाणार्‍या नगरसेवक नरेंद्र संदाशिव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांची सुध्दा बाबाशेठ यांचा संवाद झाला. ‘मुझे गोली मार दी’ ऐवढेच ते बोलले आणि बेशूध्द पडल्याचे नगरसेवक नरेंद्र संदाशिव यांनी सांगितले.

बेशुध्द अवस्थेतच बाबाशेठ यांना तात्काळ डॉ.निखील बहुगूणा यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले. उशिरा मृतदेह ग्रामिण रूग्णालयात हलविण्यात आला. उद्या सकाळी शवविच्छेदन होवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहरातील व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समर्थकांची घटनास्थळी व बाबाशेठ यांच्या निवासस्थानी गर्दी झाली होती. अतिशय मितभाषी, व्यावहाराला चोख, मदतीला धावणारे व्यक्तीमत्व असलेल्या बाबाशेठ यांच्या जीवावर उठण्याचे कारण काय? याच प्रश्नाने अमळनेरकरांना रात्रभर झोपू दिले नाही. बाबाशेठ यांच्या पश्चात वृध्द आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे.

दिनेश सोनार हत्याकांडाला उजाळा
5 डिसेंबर 2016 रोजी शहरात झालेल्या दिनेश सोनार हत्याकांडाला आजच्या घटनेमुळे पुन्हा उजेळा मिळाला. मध्यवर्ती ठिकाणी व्यवसायिकाला मारेकरी अतिशय जवळून गोळी मारून पळून जातो याला काय म्हणावे? असा प्रश्न अमळनेरकर उपस्थित करू लागले आहेत. 3 मार्च 2018 रोजी प्रा.दिपक पाटील यांचीही अशीच निघृण हत्या करण्यात आली होती. त्यांचे मारेकरीही मोकाटच आहेत. अमळनेर शहर आता सुरक्षीत राहिले नसल्याची भावना नागरीक बोलून दाखवत होते.

हत्या पूर्वीनियोजीतच!
बाबाशेठ यांची हत्या ही पुर्वनियोजीत कट असल्याचे प्रथमदर्शीनी तरी वाटत आहे. बाबाशेठ यांचे आयुष्य अतिशय रूटीन होते. ते किती वाजता घरी जातात, कोणत्या रस्त्याने जातात, त्या रस्त्यावर वर्दळ नसते याची खळा न खळा माहिती मारेकर्‍याला होती. म्हणूनच अतिशय शांतपणे तो दबा धरून बसला होता. शिवाजी बागेच्या मागच्या गल्लीतील सर्व पथदिवे आज बंद होते. हे पथदिवे तांत्रिक कारणास्तव बंद की मारेकर्‍यानेच खबरदारी म्हणून ते आधीच बंद करून ठेवण्याचा प्लॅन केला होता? याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात होते.

LEAVE A REPLY

*