‘ती’ जळगाव मनपा सध्या काय करते !

0
‘ती’ सध्या काय करते! हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘ती’ या प्रतिकात्मक शब्द प्रयोगाने वेगवेगळे ‘अन्वयार्थ’ लावले जात होते. चित्रपटातील नायिका ‘तन्वी’ विदेशातून भारतात आल्यानंतर नायक ‘अनुराग’च्या मनात तिच्या विषयी काहुर माजते आणि तो ‘ती’ सध्या काय करते! अशी विचारणा करतो.

अशीच काहीशी परिस्थिती जळगाव महानगरपालिकेसंदर्भात आहे. ‘मनपा सध्या काय करते’ अशी विचारणा जळगावकरांकडून करणे स्वाभाविकच आहे. किंबहुना विचारणा होणे अपेक्षितच आहे.

जळगाव महानगरपालिका आर्थिक संकटातून वाटचाल करीत असल्याची वस्तुस्थिती जळगावकरांना माहित आहे. त्यामुळे मनपाकडून विकासाच्या फार काही अपेक्षा नाहीत. जेव्हा आर्थिक संकट दुर होईल तेव्हा शहराचा विकास होईलच याचीही जाण जळगावकरांना आहेच!

ज्या काही दैनंदिन मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. त्यातरी नियोजनपूर्वक द्याव्यात एवढीच अपेक्षा आहे. मात्र त्याही सुविधा उपलब्ध होत नसल्याने जळगावकरांचा हिरमोड होणे स्वाभाविक आहे.

उन्हाळ्यात राज्यात सर्वत्र पाणी टंचाई सदृष्यपरिस्थीती उद्भवत असली तरी जळगाव शहर अपवाद आहे. केवळ महावितरणच्या आडमुठे धोरणामुळे आठवडाभर पाणी पुरवठा विस्कळीत झाला आणि शहरात टंचाई सदृष्यपरिस्थीती निर्माण झाली.

महावितरणची थकबाकी मनपाकडे आहे. त्यात जळगावकरांचा काय दोष? कारवाई करायची असेल, रोष व्यक्त करायचा असेल तर मनपावर करा. जळगावकरांची अडवणूक का करतात? असा सवाल निश्‍चितच उपस्थित होतो.

असो, आता तर सुरळीत पाणीपुरवठा सुर झाला. परंतु ‘पिवळसर आणि काळ्या’ पाण्याची शिक्षा कायम आहेच!
गेल्या आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस झाला आणि पहिल्याच पावसाने शहरवासियांचे नुकसान झाले.

प्रशासनाने नालेसफाईचा दावा केला असला तरी हा दावा मात्र ‘फोल’ ठरला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न तर पाचवीलाच पुजला आहे.

शहरातील ३७ प्रभागांपैकी २२ प्रभागांमध्ये दरमहा ७० लाख रुपये खर्च करुन साफसफाईचे ठेके दिले आहेत. परंतु अपेक्षित स्वच्छता होतांना दिसत नाही.

अशीच परिस्थीती जर कायम राहिली तर साथीचे आजार उद्भवल्याशिवाय राहणार नाही. जळगावकर ‘कर’ भरतात. त्यामुळे मुलभूत सुविधांबाबत अपेक्षा करणारच! परंतु ‘ती’(मनपा) सध्या काय करते! अशी विचारणा करणे स्वाभाविकच आहे.

LEAVE A REPLY

*