फुटीरतवादी नेते सज्जाद लोन  जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ?

0
काश्मीर  :  काश्मीरमधील एकेकाळचे फुटीरतवादी नेते सज्जाद लोन हे जम्मू-काश्मीरचे आगामी मुख्यमंत्री म्हणून भाजपची पसंती असल्याची चर्चा आहे. सज्जाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला अधिक उधाण आले आहे. सज्जाद लोन हे फुटीरतावादी नेते आणि हुर्रियतचे ज्येष्ठ नेते अब्दुल गनी लोन यांचे चिरंजीव आहेत.

सज्जाद लोन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असली तरी या दोघांमधील चर्चेचा तपशील अद्यापही बाहेर आलेला नाही. मात्र काश्मीरमधील एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना सज्जाद यांनी मोदींसोबत निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ही भेट झाल्यापासून सज्जाद प्रचंड खूश असल्याचंही सांगण्यात येतं.

मोदी आणि सज्जाद यांची भेट घडवून आणण्यामागे भाजपचे महासचिव राम माधव असल्याचं सांगितलं जातं.फुटीरतावादी राजकारणाला सोडचिठ्ठी देत मुख्यप्रवाहात आल्यानंतर सज्जाद यांनी मोदींची भेट घेतली. ही भेट झाल्यापासून सज्जाद यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचं त्यांचे निकवर्तीय सांगतात. सज्जाद आता हंदवाड्यातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने काश्मीर खोऱ्यात त्यांचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेसची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

काश्मीरमध्ये भाजपने दहा मुस्लिम उमेदवारांना तिकिट दिलं आहे. तसेच अनेक ठिकाणी इतर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. काश्मीरमध्ये बहुमतासाठी ४४ सदस्य संख्येची गरज आहे. या आकड्याच्या जवळपास भाजप आल्यास मुख्यमंत्री  सज्जाद लोन यांच्या नावाला भाजप पाठिंबा देण्याची शक्यता आहे. सज्जाद यांना इतर मुस्लिम आमदारही पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे भाजपने आतापासून रणनिती आखायला सुरुवात केली आहे.

अब्दुल गनी लोन आणि सज्जाद लोन यांनी २००२ मध्ये पीपल्स कॉन्फरन्सची स्थापना केली होती. काश्मीरला भारतापासून तोडण्याचा या पक्षाचा मुख्य अजेंडा होता. शिवाय हा पक्षही इतर फुटीरतावाद्यांप्रमाणे निवडणूक लढवण्याच्या विरोधात होता.

२००२ मध्येच अब्दुल गनी लोन यांची हत्या करण्यात आली. तसेच यूपीए सरकारच्या काळात सज्जाद यांना व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यामुळे सज्जाद हे त्यांच्या पाकिस्तानी नागरिक असलेल्या पत्नीला आणि दोन मुलांना दोन वर्ष भेटू शकले नव्हते. त्यानंतर त्यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.

LEAVE A REPLY

*