केवळ अन्नदानच?

0
आदिवासी बालकांमधील कुपोषण कमी व्हावे यासाठी मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. अंगणवाड्यांतील बालकांना ट्रस्टकडून पौष्टिक लाडूंचे वाटप केले जाणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर पालघर जिल्ह्यात हा उपक्रम सुरू होईल. या जिल्ह्यातील अडीच हजाराहून जास्त अंगणवाड्यांतील पावणेदोन लाखांपेक्षा अधिक बालकांना याचा लाभ होणे त्या ट्रस्टला अपेक्षित आहे.

देशात विकासाची आश्वासने रोज वाढत आहेत. सोबतच कुपोषणाची समस्यादेखील उग्र होत आहे. कुपोषणाची आकडेवारी थरकाप उडवणारी आहे. ‘असोचेम’च्या सर्वेक्षणानुसार कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या जगातील बालकांपैकी 50 टक्के बालके भारतातील आहेत. तज्ञांच्या मते पौष्टिक आहार हा कुपोषणावरचा तात्पुरता उपाय आहे. तथापि सकस आहार ही कुपोषणमुक्तीची पहिली पायरी मानावी लागेल.

आदिवासी भागातील पालकांनासुद्धा पुरेसा आहार मिळतो का? मग बालकांच्या आहाराबाबत जागरुकता कशी असेल? त्यादृष्टीने सिद्धीविनायक ट्रस्टने घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. आहार तयार करणे व त्याचा पुरवठा करणे यात सातत्य राखणे कठीण असते;

पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे काम तुलनेने सोपे झाले आहे. शिर्डीचे साईबाबा संस्थान, कोल्हापूरचे अंबाबाई देवस्थान, तुळजापूरचा तुळजाभवानी माता ट्रस्ट असे राज्यात देवस्थाननिहाय अनेक विश्वस्त न्यास (ट्रस्ट) आहेत. या न्यासांमार्फत समाजस्वास्थ्यासाठी दीर्घकालीन योजना हाती घेता येतील. गरोदर मातांचे अनारोग्य हा कुपोषणमुक्तीच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. ग्रामीण व आदिवासी भागाला सरकारी दवाखान्यांशिवाय आज तरी दुसरा पर्याय नाही.

खासगी आरोग्यसेवेचे दर परवडणारे नाहीत आणि राज्यातील आरोग्यसेवा तर स्वत:च अनारोग्याने त्रस्त आहे; पण फक्त टीका करून परिस्थिती कशी बदलणार? सरकारी आरोग्यसेवेला पूरक उपक्रम गावोगावच्या देवस्थानांचे न्यास हाती घेऊ शकतील.

शासनाच्या कुपोषणमुक्तीच्या योजना, सेवाभावी सामाजिक संस्था आणि देवस्थानांचे न्यास यांनी संयुक्तपणे चांगल्या विधायक कार्यांची उभारणी करावी. त्यासाठी मोठी कमतरता सध्या जाणवते ती सेवातत्पर कार्यकर्त्यांची! बेकारांची संख्या बरीच मोठी असल्याचे सांगितले जाते.

त्यातील सर्वच मंडळी फक्त नोकरीच्या शोधात असतील का? त्यातून योग्य तरुण-तरुणींची निवड करून त्यांना आपापल्या गावातील या काही समस्या कमी करण्याच्या दृष्टीने कार्यप्रवण करता येणे अशक्य नाही. देवस्थान न्यासांच्या विश्वस्तांनी ठरवल्यास तेच यासाठी सेवाभावी कार्यकर्ते तयार करू शकतील.

स्थानिक पातळीवर काम मिळू लागले तर बाहेर रोजगार शोधणार्‍यांचे तांडे काही प्रमाणात तरी कमी होऊ शकतील. देवस्थानांचे विश्वस्त असा विधायक विचार करतील का?

LEAVE A REPLY

*