सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग : काँग्रेससह सात पक्षांची उपराष्ट्रपतींकडे नोटीस

0
नवी दिल्ली ।  वृत्तसंस्था :  पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत काँग्रेससह सात पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. तशी नोटीसच विरोधकांनी आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे दिली. या नोटिसीवर सात पक्षांच्या खासदारांच्या सह्या असून दीपक मिश्रा यांची सरन्यायाधीशपदावरून दूर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग आणण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी आज सकाळी विरोधकांची काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीला केटीएस तुलसी, अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, भाकपचे नेते डी. राजा आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर या सर्व नेत्यांनी  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महाभियोगाची नोटीस सादर केली. दरम्यान, विरोधकांच्या या मोहिमेपासून राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेसनं दूर राहणंच पसंत केलं आहे.

71 खासदारांच्या स्वाक्षर्‍या

विरोधकांनी महाभियोगाचा प्रस्ताव तयार केला असून त्यावर 71 खासदारांनी सह्या केल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, भाकप, सपा, बसपा आणि मुस्लिम लीगच्या खासदारांनी त्यावर सह्या केल्या आहेत. उपराष्ट्रपतींकडे हा प्रस्ताव आल्यानंतर ते याबाबत एक समिती स्थापन करू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.

लोया यांच्या मृत्यूप्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच विरोधकांनी हा प्रस्ताव तातडीने आणण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं. तर याप्रकरणी राज्यसभेतील 79 खासदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा गुलाम नबी यांनी केला आहे.

काँग्रेसमध्ये दुफळी

महाभियोगाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये सरळ-सरळ दोन गट पडले असून एका गटाचा महाभियोगाला विरोध असल्याचे समोर आले आहे. माजी कायदामंत्री सलमान खुर्शिद यांच्यासह काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून माजी पंतपंधान डॉ.मनमोहनसिंग यांचीदेखील या प्रस्तावावर सही नसल्याने दोन मतप्रवाह झाले आहे.

LEAVE A REPLY

*