कुर्‍हे येथे ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेची पाहणी

0
भुसावळ । महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेत सर्व शेतकर्‍यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याने शेतकरी बांधवांना या योजनेची माहिती होण्यासाठी सुरू असलेल्या प्रचारांतर्गत तालुक्यातील कुर्‍हा येथे या योजनेची दि. 20 एप्रिल रोजी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यासह मान्यवरांनी जावून पाहणी केली.

महाराष्ट्र शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना मंजुर केली असून या योजनेत राज्यातील 250 हेक्टर पर्यंतची सिंचन क्षमता असणार्‍या धरणांमधील गाळ काढणे व तो शेतात वापरणे असे अभिप्रेत आहे.या योजनेस दि. 6 मे 2017 अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीकरिता राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या असून गाव स्तरावर ग्रामस्तरीय समिती गठीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. त्यानुसार ग्रामविकास व जलसंधारण विभाग मधील परिच्छेद 10 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या सनियंत्रण समित्यांमध्ये गावस्तरावरील ग्रामस्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या ग्रामस्तरीय समितीत अध्यक्षपदी सरपंच व सदस्य सचिवपदी संबंधित शाखा अभियंता तथा सदस्य म्हणून ग्रा.पं.चा एक सदस्य, शेतकरी प्रतिनिधी, स्वयंसेवीसंस्था प्रतिनिधी, तलाठी किंवा ग्रामसेवक यांचा समावेश राहणार आहे. या समितीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकर्‍यांना प्रोत्साहित करणे, शेतकर्‍यांना धरणातील गाळ काढण्याकरिता आवश्यक यंत्र सामुग्री व वाहने माफक दरात उपलब्ध करून देण्यास यंत्र, वाहन मालक व शेतकरी यांच्यात समन्वय साधणे आणि ज्या ठिकाणी गाळाच्या उपलब्धतेपेक्षा गाळाची मागणी जास्त आहे.

अशा ठिकाणी गाळ मागणी करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये समन्वय साधण्याचे आदेश राज्याचे अव्वर सचिव मो.बा. ताशिलदार यांनी दिले आहे. या आदेशानुसार तालुक्यातील कुर्‍हे येथे ही योजना सुरू असतांना दि. 20 रोजी पाहणी करण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यासह निवासी नायब तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, कुर्‍हे पानाचे तलाठी ज्ञानेश्वर पाटील, पोकलॅण्ड मालक वरूण इंगळे, सरपंच सुरेश शिंदे, कोतवाल प्रकाश अहिरे, शेतकरी भुवन शिंदे, वासुदेव इंगळे, अजय पाटील, रमाकांत पाटील, परशुराम बारी, सुनिल धांडे आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ घ्यावा! – तहसिलदार
या संदर्भात तहसीलदार श्री.नाईकवाडे यांनी देशदूतशी बोलतांना सांगितले की, सदर योजनेत धरणातील गाळ काढण्यासाठी शासनाच्या वतीने पेट्रोल, डिझेलचे शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे पैसे दिले जातील व गाळ उचलून वाहनाने आपल्या शेतात टाकण्याचा खर्च संबंधित शेतकर्‍यांना करावा लागणार असल्याचे सांगितले व शेतकर्‍यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*