जि.प विषय समित्यांच्या खातेवाटपाबाबत विभागीय आयुक्तांकडे सुनावणी

0

जळगाव | प्रतिनिधी :  जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे खातेवाटप अध्यक्षांनी नियमबाह्य वाटप केले असल्याने या खातेवाटपाबाबत आता १९ रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे.

या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी जि.प़ अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,अतिरीक्त सीईओ संजय मस्कर,सचिव नंदकुमार वाणी यांना आयुक्तांनी पत्र पाठविले आहे.

जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी महिला बालकल्याण समिती सभापतीपद रजनी चव्हाण यांच्याकडे असतांनादेखील बांधकाम समितीचे सभापती पद त्यांच्याकडे देऊन नियमबाह्य पध्दतीने खातेवाटप केली असल्याने याबाबत भाजपाच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असल्याने अध्यक्षांसह सीईओ व सचिवांना पत्र पाठवून सुनावणी ठेवली आहे. गेल्या महिन्यापासून आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविण्याबाबत सीईओंनी आयुक्तांकडे प्रस्ताव दिला आहे. तसेच आयुक्तस्तरावरून यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

जिल्हा परिषदेच्या खाते वाटप व विषय समित्यांच्या सदस्य निवडीचे अधिकार अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी विषय समित्यांसाठी आयोजित विशेष सभेत खातेवाटप, विषय समिती सदस्यांची निवड न जाहीर करता सभा आटोपली होती.

त्यानंतर अध्यक्षांनी १५ दिवसानंतर सभापतींना खातेवाटप व विषय समित्यांच्या सदस्यांची निवड जाहीर केली. यात उपाध्यक्षांना डावलून त्यांच्याकडे केवळ कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा समितीचे सभापती पद देण्यात आले.

पूर्वीपासून उपाध्यक्ष यांच्याकडे बांधकाम व अर्थ समितीचे सभापतीपद देण्याचा प्रघात असून रजनी चव्हाण यांच्याकडे महिला बालकल्याण समितीचे सभापती पद असतांना त्यांच्याकडे बांधकाम समितीचे सभापतीपद देऊन अध्यक्षांनी नियमबाह्य खातेवाटप जाहीर केले होते.

याबाबत भाजपाच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनीदेखील आयुक्तांकडे तक्रार केली असल्याने त्यांनादेखील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.

खातेवाटपाची प्रक्रिया वांध्यात असल्याने या सुनावणीत आता काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.

नियमबाह्य खातेवाटपाबाबत तक्रार- पल्लवी सावकारे

अध्यक्षांनी चुकीच्या पध्दतीने खातेवाटप केली असल्याने याबाबत विभागीय आयुक्तांकडे केलेली आहे. ही तक्रार व्यक्तीद्वेषातून केलेली नसून नियमबाह्य खातेवाटपाबाबत केली आहे.

LEAVE A REPLY

*