जळगाव तालुक्यात वीज पडून एक ठार : एक गंभीर

0
जळगाव |  प्रतिनिधी :  तालुक्यातील कुसूंबा खुर्द येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरपुर तालुक्यातील बोराडी जवळील खिले बोर्ड येथील रहिवाशी प्रकाश गुलाब पावरा (वय ३८) हे रोजगारानिमीत्त जळगाव तालुक्यातील कुसूंबा खुर्द्र येथे कुटूंबियांसोबत सहा महिन्यापासुन आले होते.

सकाळी शौचालयास जात असतांना त्यांच्या अंगावर अचानक वीज पडली. यामुळे पावरा भाजले गेले. याचवेळी त्यांच्याजवळ असलेल्या खंडू सुकलाल पावरा (वय ३५) त्यांच्या अंगावर देखील वीज पडली

प्रकाश पावरा यांचा जागीच मृत्यू झाला. तर खंडू पावरा गंभीररित्या भाजले गेले. दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रकाश पावरा यांना वैद्यकिय अधिकारी डॉ.सुतार यांनी मयत घोषित केले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोहेकॉ.बाळकृष्ण पाटील करीत आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर कुवरसिंग गुलाब पावरा यांच्याकडे प्रकाश पावरा यांचा मृतदेह सोपविण्यात आला. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.

जळगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात काल दि. १० रोजी मध्यरात्री सर्वत्र जोरदार पाऊस झाला. जळगाव तालुक्यात ७४.१ मिमी पाऊस झाला असुन अतिवृष्टीची नोंद जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

जुन महिन्याच्या सुरवातीपासुनच वरूणराजाने जिल्ह्यावर कृपा दाखवलेली आहे. जिल्ह्यात काल दि. १० रोजी मध्यरात्री सर्वच तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, नाल्यांना पुरसदृश परीस्थीती दिसून आली.

जिल्ह्यातील जळगाव तालुक्यात सर्वाधिक ७४.१ मिमी पाऊस झाला आहे. ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने जळगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

तसेच एरंडोल तालुक्यात- ४१ मिमी, रावेर २६.९ मिमी, पाचोरा २५, भुसावळ २०.९, धरणगाव १७.३, चाळीसगाव १५.६, जामनेर १४.०, चोपडा १३.३, पारोळा १२.४, यावल १२.०, बोदवड ९.०, भडगाव ५.३, मुक्ताईनगर ५.०., अमळनेर ३.४ असा एकूण २९५.२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात दि. १ जून ते आजपर्यंत सरासरी ९.९ टक्के पाऊस झाला असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले.

धरणांची परीस्थीती समाधानकारक

सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस होत असल्याने धरणांचीही परीस्थीती समाधानकारक आहे.

यात वाघुर धरणात ६५.६८ टक्के, गिरणा २५.६४ टक्के, हतनूर ६.०६, मंगरूळ ३२.३४, सुकी ४२.९३, अभोरा ५२.१३, मोर ३५.९७, गुळ ३.२१, तोंडापूर १८.७१, तर मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, अंजनी, बहुळा या धरणात अद्याप शुन्य टक्के पाणीसाठा असल्याचे पुर नियंत्रण कक्षाच्या सुत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*