Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणारे शिक्षक पुरस्काराला पात्र ठरतात : कविवर्य अशोक सोनवणे 

Share
चोपडा | प्रतिनिधी :     सध्या शिक्षण क्षेत्रातील बदलांचा शिक्षण प्रक्रियेवर परिणाम होत आहे.अशा परिस्थितीत योग्य पद्धतीने काम करणे हे एक आव्हान आहे. परंतु या अडचणींवर मात करुन विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणारे शिक्षक पुरस्काराला पात्र ठरतात. कुठलेही प्रस्ताव न मागवता प्रत्यक्ष कार्याच्या आधारावर शिक्षकांनी शिक्षकांचाच करावा सन्मान म्हणून सेवा मंडळ पुरस्कारार्थीची निवड करत असते, ही खरोखर उल्लेखनीय बाब आहे.पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपल्या कार्यातून इतरांना प्रेरणा द्यावी, असे प्रतिपादन कविवर्य अशोक सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

येथील सेवा शिक्षक मंडळाच्यावतीने ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ ( वर्ष १७ वे ) प्रदान सोहळा नगरपरिषद नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्यात तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील दहा गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कविवर्य अशोक सोनवणे हे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व व्यावसायिक विकास संस्थेचे अधिव्याख्याता डॉ.डी. बी. साळुंखे, विषय सहाय्यक अल्ताफ सैय्यद,सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर केंगे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सतिष पठार, तालुकाध्यक्ष सुनील पाटील,केंद्रप्रमुख कृष्णा बाविस्कर, सैंदाणे यांच्यासह मंचावर सेवा शिक्षक मंडळाचे अध्यक्ष विलास पाटील खेडीभोकरीकर,नरेंद्र भावे हे उपस्थित होते.

यावेळी अधिव्याख्याता डॉ.डी.बी.साळुंखे यांनी मनोगतात पुरस्कारार्थी शिक्षकांचे अभिनंदन करत सेवा शिक्षक मंडळाच्या या उल्लेखनीय उपक्रमाचे कौतुक केले. प्रमुख मार्गदर्शक अल्ताफ सैय्यद यांनी ‘शिक्षकांच्या ताणतणावाचे व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन करतांना तणाव ही मानसिक अक्षमता आहे, असे सांगितले.

आपल्या जगण्याचे नियंत्रण दुसऱ्याच्या हाती दिल्याने ; त्याच्या प्रतिक्रियावर अवलंबून झाल्याने जीवनात ताणतणाव येतात. कामाला ओझं न समजता आनंद मानून काम केले पाहिजे.कार्यसंस्कृती अंगिकारल्यास जीवन आनंदी होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुरस्कारार्थीच्या वतीने सौ.शुभांगी भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आंनद प्रताप पाटील ( कन्या विद्यालय चोपडा), अतुल नरेंद्र भट (प्रताप विद्या मंदिर),दिनेश नारायण बाविस्कर ( महात्मा गांधी मंडळाचे माध्यमिक विद्यालय ),संजीव सीताराम शेटे ( जि. प. शाळा चौगाव), सौ.शुभांगी मंगेश भोईटे( जि. प.शाळा, गणपूर), अतुल शांताराम चव्हाण (साने गुरुजी विद्यालय,वडती), सुनिल प्रताप पाटील ( राजेंद्र माध्यमिक विद्यालय, गोरगावले), देविदास हिरामण महाजन (झि. तो.महाजन विद्यालय, धानोरे प्र.), प्रल्हाद उत्तम पाटील (जि.प.शाळा, मंजरे हिंगोणे), अनिल चिंतू पाटील ( पंकज विद्यालय ) या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृती चिन्ह मानपत्र,पदक,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी, सुत्रसंचलन राधेश्याम पाटील यांनी व आभार प्रदर्शन संजय बारी यांनी केले. ईशस्तवन ए. पी. पाटील यांनी सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगेश भोईटे, संजय सोनवणे, एच.बी.मोरे, गोपाल पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!