बाजारात तुरी…

0
‘बुलेट ट्रेन’ हा पंतप्रधानांचा एक महत्त्वाकांक्षी स्वप्नाळू प्रकल्प! बुलेट ट्रेन धावेल तेव्हा धावेल. जाहीर केलेल्या सरकारी अंदाजानुसार ती वेळेवर सुरू झाली तरी तो मुहूर्त आहे 2022 सालचा! नियोजनाप्रमाणे काम सुरू झाले व ठरल्या वेळेत पुरे झाले तरच हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार आहे. आताशी कुठे प्रकल्पाची प्राथमिक तयारी सुरू आहे.

बोली भाषेत सांगायचे तर जेमतेम ‘सुपारी फुटली’ आहे. लग्नाला अजून बराच काळ जायचा आहे. मात्र आतापासूनच स्वप्नात रंग भरण्याचे काम जोमात सुरू आहे. लग्न झाले असे समजून नियोजित दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी? मग त्याचे वा तिचे नाव काय ठेवायचे? बाळलेणी कोणती-कोणती आणायची?

याच्या चर्चेने माध्यमांतून जनतेला झुलवण्याचा उद्योग जोरात आहे. तोट्यातील भारतीय रेल्वेला हा प्रकल्प झेपेल का? आर्थिकदृष्ट्या तो किती व्यवहार्य ठरेल? ही सर्व अद्याप कल्पना चित्राचीच नक्षी आहे. मात्र धावू लागल्यावर बुलेट ट्रेनच्या तिकिटाचा दर किती असेल याच्याबद्दल तर्‍हेतर्‍हेच्या बातम्या झळकत आहेत. प्रारंभिक भाडे फक्त तीन हजार असेल.

सध्या या मार्गावर धावणार्‍या दुरांतो गाडीच्या कमाल दरापेक्षा जेमतेम एक हजार रुपयांनी ते जास्त असेल, अशा अनेक वावड्या राष्ट्रीय गतिमान रेल्वे महामंडळाकडून का उडवल्या जात आहेत? ज्यांच्या जमिनी बुलेट ट्रेन गिळंकृत करणार आहे त्या शेतकर्‍यांना भूसंपादनाबाबत अजून तरी विश्वासात घेतले गेलेले नाही.

मात्र नियोजित साबरमती स्थानकावर महात्मा गांधींच्या ऐतिहासिक दांडी यात्रेचे आरेखन केले जाणार हेही सांगितले जाऊ लागले आहे. प्रचाराची राळ उडवण्याची इतकी घाई का लागली असावी? लवकरात लवकर बुलेट ट्रेन धावलीच तर ते वर्ष असणार आहे 2022! मग आताच हा प्रचाराचा गदारोळ संशयास्पद वाटावा असा नाही का?

‘बाजारात तुरी आणि…’ या म्हणीसारखा हा अधिकृत ‘सरकारी जुमला’ म्हणावा का? जम्मू-काश्मीरमधील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील महिला अत्याचारांची दोन प्रकरणे सध्या देशभर गाजत आहेत. विविध घटकांवर अत्याचार सुरूच आहेत. शेतकर्‍यांचा आक्रोश सुरू आहे. लाखो सुशिक्षित तरुण नोकर्‍यांच्या शोधात आहेत. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे.

दहशतवादी हल्ल्यांत अनेक भारतीय जवान शहीद होत आहेत. या सर्व घटनांचे गांभीर्य झाकले जावे व देशवासियांचे लक्ष काश्मीरमधील बुलेटऐवजी ‘बुलेट’ नावाच्या ट्रेनकडे वळवण्याचा हा सहेतूक उपद्व्याप समाजावा का? एरव्ही ताज्या बातम्यांनी सुरू झालेला ‘बुलेट कौतुकचालिसा’चा अर्थ तरी कसा लावणार?

LEAVE A REPLY

*