‘सरोगसी’ म्हणजे हुकुमी ‘पुत्रकामेष्टी’?

0
‘सरोगसी’ तंत्राचा अवलंब करून वंध्यत्व निवारण करणारी अनेक प्रमुख रुग्णालये व केंद्रे मुंबईत वाढत आहेत. गेल्या नऊ वर्षांत पंधरा हजार बालकांचा जन्मसोहळा ‘सरोगसी’ तंत्रज्ञानातून पार पडला, अशा बातम्या नुकत्याच झळकल्या.

मात्र माहितीच्या अधिकारातून त्याबद्दल एक नवलाईसुद्धा उघड झाली आहे. सरोगसी तंत्रज्ञान वापरून जन्मास घातलेल्या मुलांमध्ये मुलींचे प्रमाण नगण्य आहे. मुलेच मोठ्या संख्येने जन्मास आली आहेत. ही माहिती व आकडेवारी खरी असेल तर ‘सरोगसी’ तंत्रज्ञान वापराबाबत ती संशय निर्माण करणारीसुद्धा आहे.

मुंबईत भाटिया, पारसी, ब्रीच कॅण्डी, चौपाटी, ब्राह्मण सभा, जसलोक, फौजिया, सैफी, एलिझाबेथ आदी अनेक नावाजलेली रुग्णालये आहेत. तेथे ‘सरोगसी’द्वारे निपुत्रिकांना मातृ-पितृत्वाचा आनंद देण्याचा उपक्रम वाढत्या गतीने सुरू आहे. तथापि तो आनंद ‘बर्फी’पेक्षा अनेक पटींनी ‘पेढ्यां’च्या स्वरुपातच का वाटला जातो? ‘सरोगसी’चे तंत्र वापरतानासुद्धा ‘मुलगा’च जन्माला यावा या अपेक्षेला प्राधान्य दिले जाते का? पालकांकडून तशी अपेक्षा व्यक्त केली जाणे कदाचित क्षम्य ठरेल.

तथापि ‘सरोगसी’चा वापर करणारे डॉक्टर्स, नर्सेस व संबंधित रुग्णसेवकवर्ग हे सर्व त्या अपेक्षेला मान तुकवत असावेत का? तसे होत असेल तर मात्र ‘सरोगसी’ हा आधुनिक काळातील ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञच का म्हणू नये? केवळ मुलेच जन्माला येणे हे कोणत्याही तंत्रज्ञानाकडून कसे शक्य आहे? ‘सरोगसी’बाबत अजून पुरेसे कडक निर्बंध नाहीत, असे तज्ञांकडूनही सांगितले जात आहे.

तर काहींच्या मते ‘सरोगसी’ ही ‘फॅशन’ झाली आहे. संबंधित केंद्रे आपल्याकडे किती बाळे जन्मास आली याची नोंदणी करीत नाहीत. त्यांच्यावर कायद्याचा पुरेसा वचक नसल्यामुळे त्याचा पुरेपूर गैरफायदा उचलला जात असावा का? राज्याच्या आरोग्य यंत्रणेला याबाबत काही दखल घ्यावीशी वाटते का? ‘वंशाचे दिवे’ जन्माला घालण्याचे काम आता देशातील अनेक शहरांमधून सुरू आहे.

त्या सर्वच ठिकाणांचे यादृष्टीने सर्वेक्षण होणे वास्तवावर पुरेसा प्रकाश टाकण्यास उपयुक्त ठरेल. सोनोग्राफी तंत्राचा देशात मोठ्याप्रमाणावर गैरवापर होतो. केवळ ‘मुलगा’च व्हावा म्हणून स्त्रीभ्रूणहत्या घडवण्यात काही सोनोग्राफी केंद्रांचा हात आढळला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेळोवेळी कारवाई होऊनही स्त्रीभ्रूणांचे हे ‘कत्तलखाने’ अद्याप पुरेसे नियंत्रणात आलेले नाहीत हे वास्तव नाकारता येईल का? कदाचित त्यामुळेच तर ‘सरोगसी’ या हुकुमी ‘पुत्रकामेष्टी’ तंत्राचा वापर वाढत असेल का?

LEAVE A REPLY

*