जलनियोजन ठरावे अंदाजपूरक

0
वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकीकरणावर दिला जाणारा भर आदी कारणांमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. ती पूर्ण करण्यासाठी पाण्याचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. यातून भूगर्भातील पाण्याची पातळी बरीच खोल जात आहे.आणखी काही वर्षे असेच चित्र कायम राहिले तर भूगर्भातील पाणीसाठा संपून जाण्याची भीती आहे. यावर्षी चांगला पाऊस होण्याचे संकेत असताना हे चित्र कसे बदलता येईल?

उन्हाची तीव्रता वरचेवर वाढत आहे तशी पाणीटंचाईची समस्याही समोर येत आहेत. पावसाळा सुरू होण्यास अजून बर्‍यापैकी कालावधी आहे. तोपर्यंत पाणीटंचाईची समस्या किती तीव्र होईल याची कल्पनाच केलेली बरी. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे ‘नेमेचि येतो दुष्काळ’ अशी स्थिती पाहायला मिळत आहे. देशातील काही भाग आजही परंपरागत दुष्काळी म्हणून गणला जातो. या भागाचे दुष्काळमुक्तीचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही.

विशेष म्हणजे सरासरीएवढा वा त्याहून अधिक पाऊस पडूनही काही भागात दुष्काळ तसेच पाणीटंचाईचे संकट निर्माण होत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे पाऊस कमी किंवा अत्यंत अपुरा झाला की दुष्काळी स्थिती निर्माण होते, हे पारंपरिक समीकरण चुकीचे ठरू लागले आहे.

असे असेल तर दुष्काळावर कायमस्वरुपी मात कशी करता येणार, हा खरा प्रश्न आहे. मुख्यत्वे पुरेसा पाऊस होऊनही पाणीटंचाई निर्माण होत असेल तर त्यासाठी मानवी चुकाच कारणीभूत आहेत, असे म्हणता येईल. देशात पाणी साठवणुकीच्या विविध योजना वर्षानुवर्षे राबवल्या जात आहेत. त्यावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यासारख्या योजनांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. अशा योजनांद्वारे नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले जाते. मात्र याचेही अपेक्षित परिणाम समोर येताना दिसत नाहीत.

दुसरीकडे पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकीकरणावर दिला जाणारा भर या तसेच अन्य कारणांनी पाण्याची मागणी वरचेवर वाढत चालली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जातो. त्यासाठी जागोजागी कूपनलिका खोदल्या जातात. गेल्या काही वर्षात कूपनलिकांमधून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा उपसा करण्यात आला असून ते प्रयत्न आजही सुरू आहेत, परंतु याचा परिणाम म्हणून भूगर्भातील पाण्याची पातळी बरीच खोल चालल्याचे दिसत आहे.आणखी काही वर्षे असेच चित्र कायम राहिले तर भूगर्भातील पाणीसाठा संपून जाण्याची भीती तज्ञ व्यक्त करत आहेत.ही गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर पाणी बचतीचा मंत्र आचरणात आणायला हवा. याच्या जोडीला पाण्याचा योग्य वापरही गरजेचा ठरणार आहे.

एक गोष्ट मात्र खरी की, कमी-अधिक प्रमाणात का होईना मान्सून सर्वत्र हजेरी लावतो. तो कुठेच आला नाही, असे होत नाही. त्यामुळे त्याच्या येण्याबद्दलची शाश्वती असते, फक्त त्याचे प्रमाण किती राहणार हा विशेष जाणून घेण्याचा भाग असतो. त्यादृष्टीने हवामान अंदाजांना अनन्यसाधारण महत्त्व असते.

गेल्या काही वर्षांमध्ये हवामान अंदाजाची अचूकता लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. तरीसुद्धा हवामानाचा अंदाज वर्तवणे ही एक गुंतागुंतीची कला आणि शास्त्र आहे. प्रत्येक वेळी हे अंदाज खरे ठरतीलच असे म्हणता येत नाही. वैज्ञानिकांना जगातील इतर ठिकाणच्या हवामानाच्या परिस्थितीची माहिती अत्यंत वेगाने प्रसारित करण्याची पद्धत शोधून काढण्याची गरज होती. याचदरम्यान अस्तित्वात आलेली बिनतारी संदेशाची व्यवस्था उपयुक्त ठरली. याच्या सहाय्याने पॅरिस वेधशाळेने 1863 मध्ये आधुनिक प्रकारचे हवामान नकाशे प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

1872 मध्ये ब्रिटनच्या हवामान खात्यानेही असे करण्यास सुरुवात केली होती. हवामानाचे शास्त्र अत्यंत गुंतागुंतीचे आहे. हवामान नकाशांमधून अतिरिक्त माहिती प्रसारित करता यावी म्हणून अधिक स्पष्ट माहिती देण्याची नवी पद्धत शोधून काढण्यात आली. उदाहरणार्थ, वायुदाबमापकानुसार सारखा दाब असलेल्या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी समदाबरेषांचा उपयोग केला जातो. तसेच समान तापमान असलेली ठिकाणे जोडण्यासाठी समतापरेषांचा उपयोग केला जातो. हवामान नकाशात वार्‍याची दिशा आणि जोर दाखवण्यासाठी विशिष्ट चिन्हे वापरली जातात तसेच रेषांच्या सहाय्याने उष्ण आणि शीत हवेचे दोन वेगळे पुंज मिळतात ती ठिकाणे दाखवली जातात.

आजकाल संपूर्ण जगातील अनेक हवामान केंद्रांमधून रेडिओसाँडस् हे उपकरण लावलेले फुगे हवेत सोडले जातात. या उपकरणाच्या सहाय्याने वातावरणीय परिस्थितीचे मापन करून ती माहिती रेडिओद्वारे हवामान केंद्राला प्रसारित केली जाते. रडार यंत्रणेचाही उपयोग केला जातो. ढगांमधील मेघकणांकडून आणि बर्फकणांकडून परावर्तीत होणार्‍या रेडिओ तरंगांद्वारे हवामानतज्ञ वादळाच्या मार्गाचा वेध घेऊ शकतात. अचूक हवामान निरीक्षणात 1960 मध्ये लक्षणीय प्रगती झाली. यावर्षी टीव्ही कॅमेरा जोडलेल्या टायरोस- 1 नावाच्या पहिल्या हवामान उपग्रहाने आकाशात झेप घेतली. आज एका ध्रुवापासून दुसर्‍या ध्रुवापर्यंत पृथ्वीभोवती अनेक हवामान उपग्रह फिरत आहेत. तर काही भूस्थिर उपग्रह पृथ्वीच्या कोणत्याही एका भागावर अवकाशात स्थिर राहून विशिष्ट भागाचे सतत निरीक्षण करत राहतात. हे दोन्ही प्रकारचे उपग्रह वरतून पाहिलेली हवामानाची चित्रे पृथ्वीवर प्रसारित करतात. याद्वारे हवामानाच्या स्थितीची कल्पना येऊन त्यासंदर्भातील अनुमान काढणे शक्य होते. मात्र हवामान अंदाजाद्वारे मान्सूनबाबत दिलासा देण्यात आला आणि त्यानुसार प्रत्यक्ष मान्सून समाधानकारक राहिला तरी पुढचा पावसाळा येईपर्यंत त्या पाण्याचे नियोजन आपल्याच हातात असते.

खरे तर भारताला अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर अशा तिन्ही बाजूंना असलेला समुद्र आणि ईशान्येपासून उत्तरेपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा यामुळे मान्सूनची देणगी मिळाली आहे. परंतु पाऊस विविध घटकांवर अवलंबून असल्याने मान्सून कमी-जास्त होतो. देशातील जनसामान्य, विशेषतः शेतकरी मान्सूनकडे अतिशय श्रद्धेने आणि आस्थेने पाहतात. त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि भावजीवनातही पावसाला वेगळे स्थान आहे. मुख्यत्वे भारतीय शेती पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा किती हा मुद्दा कायम चर्चिला जात असला तरी शेतीवर अजूनही सुमारे 59 टक्के लोक अवलंबून आहेत, हे विसरून चालणार नाही.

शिवाय पावसाच्या आगमनाच्या वार्तेकडे केवळ शेतकर्‍यांचेच लक्ष असते असे नाही तर राज्यकर्ते, अधिकारी, बँकर्स, अर्थतज्ञांचेही लक्ष लागलेले असते. त्याचे कारण देशातील महागाई नियंत्रित ठेवण्यातही पाऊस महत्त्वाची भूमिका बजावत असतो. महागाईवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून शेतीकडे पाहिले जाते. शेतमालाचे उत्पादन चांगले झाले तर भाव नियंत्रणात राहतात. परिणामी वाढत्या महागाईला आळा बसतो. यावरून पावसाचे अनन्यसाधारण महत्त्व प्रतीत होते. विविध पाटबंधारे प्रकल्पांमध्ये साठवलेल्या पावसाच्या पाण्याच्या वाटपाबाबत प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. त्यानुसार पहिले प्राधान्य पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना दिले जाते. त्यानंंतर शेतीला पाणीपुरवठा केला जावा आणि त्यानंतर उद्योगांसाठी पाणी दिले जावे, असे ठरवण्यात आले आहे. मात्र हा प्राधान्यक्रम बाजूला ठेवून पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांनंतर उद्योगांना प्राधान्याने पाणीपुरवठा केल्याची काही उदाहरणे समोर येतात. अशा स्थितीत शेतीसाठी पाणीपुरवठ्याबाबत अन्याय होत असल्याचे दिसते.

उत्तम पावसाने विविध पाटबंधारे प्रकल्प तुडुंब भरले की त्याच्या नियोजनाकडे लक्ष दिले जात नाही. मात्र मार्च-एप्रिलमध्ये अशा प्रकल्पातील पाणीसाठा बराच कमी होऊ लागतो तेव्हा पाणी कपातीच्या घोषणा केल्या जातात. शहरी भागात पाणी कपातीची घोषणा केली की जनतेतून असंतोष व्यक्त केला जातो. परंतु ही वेळ का आली, याचे आत्मपरीक्षण होण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या काळात आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही. कधी तरी टँकर येतो. त्यातून पाणी घेण्यासाठी झुंबड उडते.

हंडाभर पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागते. हे चित्र कधी बदलणार, हा खरा प्रश्न आहे. असे असले तरी अलीकडे जलसंरक्षण, जलवाटप नियोजन यासंदर्भात शासकीय पातळीवर तसेच निसर्गप्रेमी संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत. इथे राज्य शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेचाही विचार करावा लागेल. या योजनेबाबत काही तक्रारी समोर येत असल्या तरी विविध ठिकाणी शिवारात झालेल्या उत्तम पाणीसाठ्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. तसेच शेतीलाही दिलासा मिळाला. ‘नाम’सारख्या संस्थांनीही पाण्याच्या प्रश्नावर चांगले काम केले आहे. मात्र असे प्रयत्न खर्‍या अर्थाने यशस्वी व्हायचे तर त्यात अधिकाधिक लोकसहभागाची आवश्यकता आहे. तशी चळवळ रूजत आहे, ही समाधानाची बाब म्हणायला हवी.
– प्रा. अशोक ढगे

LEAVE A REPLY

*