महामानवास अभिवादन!

0
यथार्थतेने महामानव म्हणून गौरवली गेलेली व्यक्तिमत्त्वे विश्ववंद्य होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यापैकी एक! त्यांची आज 127 वी जयंती! बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. प्रचंड परिश्रम व अभ्यासाच्या बळावर त्यांनी सामाजिक, राजकीय, कायदा, पत्रकारिता, अर्थकारण, शैक्षणिक आदी अनेक क्षेत्रात आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेे.

महत्त्वाकांक्षेला त्यांनी कृतिशीलतेची जोड दिली. समाजव्यवस्थेने ज्यांना नाकारले होते अशा वर्गाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी आपली हयात वेचली. जगण्याचा नवा मार्ग दाखवला. विदेशात जाऊन अर्थविज्ञानात डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.

घटना समितीचे अध्यक्षपद व देशाचे पहिले केंद्रीय कायदामंत्रिपद त्यांनी भूषवले. ‘आपण प्रथम भारतीय आहोत आणि अखेरीसही भारतीयच राहणार’ ही त्यांची भूमिका होती. दलितांचा आत्मसन्मान जागवण्याकरता त्यांनी धर्मांतर करतानासुद्धा भारतात स्थापन झालेल्या बौद्ध धर्माला पसंती दिली. ‘इतरांच्या दुर्गुणाची उपेक्षा करून त्यांच्यातील सद्गुणांचा शोध घेणे आणि वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करणे ही अखंड तपश्चर्या आहे. त्या तपश्चर्येसाठी कमालीचा संयम आत्मसात करावा लागतो.

माणसाला आपल्या दारिद्य्राची लाज वाटण्याचे कारण नाही. मात्र आपल्या दुर्गुणांबद्दल ती वाटावयास हवी, असा उपदेश ते नेहमी करीत. नदीजोड प्रकल्प गेली काही दशके चर्चेत आहे. त्या कल्पनेचे बीजारोपण आंबेडकरांच्या साहित्यात आढळते. हिराकुंड, दामोदर व सोन नद्यांवरील नदीखोरे प्रकल्पांची सुरुवात तसेच देशाच्या जल धोरणाची पायाभरणी त्यांच्याच कार्यकाळात झाली.

‘सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली म्हणजे राजकीय शक्ती’ हा बाबासाहेबांचा विचार आज किती तथाकथित नेते अमलात आणत आहेत? उलट अलीकडच्या काळात उफाळून आलेले सर्वपक्षीयांचे बाबासाहेबांविषयीचे प्रेम किती निरहेतूक आणि उदात्त असावे?

त्यांच्या विचारांची राजकीय ओढाताण कोण कशासाठी करीत आहे? हे निष्ठावान आंबेडकर भक्त निश्चित समजत असतील. बाबासाहेबांनी नेहमीच साक्षरता व शिक्षणाचा पुरस्कार केला. शिक्षणाला त्यांनी अत्यंत पवित्र व विधायक क्षेत्र मानले. ‘शाळेत मने सुसंस्कृत होतात.

शाळा म्हणजे सुसंस्कृत नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र व समाजपरिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे’ असे ते म्हणत. या पवित्र क्षेत्रात आज चालू असलेली हेळसांड व पावित्र्याचा र्‍हास निष्ठावान आंबेडकर भक्तांनी मनावर घेतले तरच थांबू शकेल. महामानवाच्या स्मृतीस जयंतीनिमित्त अभिवादन!

LEAVE A REPLY

*