बलात्कार्‍यांना ‘घराचा आहेर’?

0
बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणात लोकप्रतिनिधी व पोलिसांवर सहभाग आणि आरोपींवर तातडीने कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सरकारवर होणे ‘संस्कृतीसंपन्न’ भारतीयांना अस्वस्थ करीत असेल का? बलात्काराचे ताजे प्रकरण जम्मू-काश्मिरातील आहे.

बकरवाल समाजातील एका आठ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेत स्थानिक पोलीस अधिकारीही सहभागी असल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव गावातील एका अल्पवयीन मुलीने स्थानिक आमदाराने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली.

तिच्यावरील अन्यायाविरोधात दाद मागणार्‍या तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणातील पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. बलात्कारासारख्या संवेदनशील व स्त्रीचे जीवन बरबाद करणार्‍या घटनांना जातीय व धार्मिक तेढीचे रंग देण्याचा लाजीरवाणा प्रयत्न केला गेला.

दोन्ही घटनांतील राज्यकर्त्यांची संवेदनहीन भूमिका किळसवाणी व जगात भारतीय संस्कृतीचे धिंडवडे काढणारी आहे. काश्मिरात विशिष्ट विचारसरणीच्या पुरस्कर्त्या संघटना रस्त्यावर उतरल्या. बलात्कारीत मुलीच्या समाजावर जमिनी हडप करीत असल्याचे आरोप केले गेले.

त्या बदल्यात बलात्कार करण्याची मुभा कुणी दिली होती का? उन्नावच्या बलात्कारीत मुलीने आमदारावरच आरोप केल्याने आमदाराच्या भावाने मुलीच्या वडिलांना मारहाण केली. आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात नव्हती, असा दावा सत्ताधारी पक्षाच्याच माजी राज्यमंत्र्याने केला आहे.

अंतर्गत लाथाळ्या व कुरघोडीचे उत्तर प्रदेशी राजकारण कोणत्या थराला गेले आहे हे यावरून स्पष्ट होते. संधिसाधू राजकारणाची किंमत अबोध बालिकांवर बलात्कार करून वसूल करण्याचा पायंडा सरकारची याबाबतची डोळेझाक पाडू पाहत आहे का? स्त्री सबलीकरणाच्या गप्पा मारणार्‍यांनी राजकारणाची गणिते साधण्यासाठी स्त्रियांनाच वेठीला धरावे? ‘आगळावेगळा पक्ष’ (पार्टी वुईथ डिफरन्स) म्हणतात ते वेगळेपण हेच का?

या प्रकरणातील तथ्य यथावकाश बाहेर येईलच; पण पंतप्रधानांनी यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. देशात दिसामासाने वाढणार्‍या लज्जास्पद घटनांना आळा घालण्यात त्यांच्याखेरीज सध्यातरी अन्य कोणी समर्थ या देशात जनतेला दिसत नाही.

‘निवडणुकीत यश मिळवणे अवघड असते; पण मिळालेले यश टिकवणे त्यापेक्षा अवघड असते’ अशी जाहीर कबुली महाराष्ट्राच्या एक महिला मंत्र्याने पक्ष मेळाव्यात दिली. हा योगायोग की स्वकियांना दिलेला ‘घरचा आहेर’?

LEAVE A REPLY

*