गणवेश वाटप प्रक्रियेचा खेळखंडोबा : बँक खात्यामुळे प्रक्रिया लांबणार

0

जळगाव | प्रतिनिधी :  जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या १८९२ शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व मुली व एस.सी. एस.टी व बीपीएल कार्डधारक मुलांना सर्व शिक्षा अभियांनातर्ंगत गणवेश देण्यात येणार आहे.

यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांसह त्यांच्या आईच्या नावे बँकेत खाते उघडून गणवेशाच्या ४०० रुपयांचे अनुदान थेट खात्यात देण्यात येणार आहे. परंतु यासाठी ५०० रुपयांचे बँकेत खाते उघडावे लागत आहे. त्यामुळे गणवेश वाटपाची प्रकिया चांगलीच लांबणार असल्याने या प्रकियेचा चांगलाच खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी गणवेश खरेदीची रक्कम जि. प शिक्षण विभागामार्फत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे वितरीत केली जात होती. त्यानंतर ती तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येत होती. परंतु या खरेदीच्या प्रक्रियेत अनियमितता होत असल्याने दरवर्षी तक्रारी प्राप्त होत असायच्या.

त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने गणवेश वाटपाचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात देण्याचे ठरविले आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात येते.

यावर्षी शासनाने गणवेशाचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्याचे ठरविले असून यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांला त्यांच्या आईसोबत बँकेत खाते उघडावे लागणार आहे. एका गणवेशासाठी २०० रुपये तर दोन गणवेशसाठी ४०० रुपये लाभार्थी विद्याथ्यार्ंना मिळणार आहे.

परंतु त्यासाठी पालकांना बँकेत ५०० रुपये भरून खाते उघडावे लागणार आहे. त्यामुळे लाभार्थांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. ४०० रुपयांच्या गणवेशाचे बिल मुख्याध्यापकांकडे दिल्यानंतर गणवेशाचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

परंतु अद्याप बर्‍याचशा शाळेतील लाभार्थी विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडलेली नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नसल्याने या प्रक्रियेमुळे गणवेश वाटपाची प्रकिया लांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

८ दिवसांत शाळांच्या खात्यावर निधीचे वाटप

जिल्हयातील १८९२ जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळेतील १ लाख ५९ हजार ६१९ लाभार्थ्यांच्या खात्यावर गणवेशाचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी ३८ लाख ४७ हजार ६०० रुपयंाचा निधी मंजुर असून येत्या ८ दिवसात तालुकास्तरावरून शाळांच्या खात्यांवर निधीचे वाटप करण्यात येणार आहे.

बिले दिल्यानंतर मिळणार गणवेशाचे अनुदान

दोन गणवेशासाठी ४०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर देण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी गणवेशाची बिले मुख्याध्यापकांकडे सादर केल्यानंतरच ४०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे महिन्याभरात विद्याथ्यांना गणवेश मिळेल की नाही यात सांशकता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*