विरोधकमुक्त जामनेर!

0
जामनेर नगरपालिकेत नगराध्यक्षांसह सर्व 24 नगरसेवक निवडून आणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी भाजपाची एकहाती सत्ता आणली आहे. ना.महाजनांचे राज्याच्या राजकारणात वर्चस्व आहेच, या शतप्रतिशत विजयामुळे त्यांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे.

2014 ला देशात आणि राज्यातही सत्ता आली तेव्हापासून भाजपाची एकूणच कार्यशैली देश काबीज करण्याची आहे. गेल्या दोन वर्षांपासून तर काँग्रेसमुक्त भारत करण्याची तयारी भाजपाने चालविली आहे. त्यासाठी वाट्टेल ती खेळी खेळली जात आहे. मोदी, शहा यांचे देश काँग्रेसमुक्त करण्याचे मनसुबे अद्याप यशस्वी झाले नसले तरी गिरीश महाजनांनी मात्र निदान जामनेर पालिका विरोधकमुक्त करुन टाकली आहे.

लोकशाहीत सत्तापक्षाएवढेच महत्व विरोधी पक्षालाही असते. सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी विरोधकांची असते. विरोधक असल्याने सत्ताधारीही किमान वचकून काम करतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. जामनेर पालिकेत मात्र कोणताही विरोध महाजनांना आता असणार नाही. त्यामुळे निकोप लोकशाहीसाठी स्वतःच्या पक्षाच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांवर सक्षम नेतृत्वाएवढीच एका कणखर विरोधकाचीही भूमिका महाजनांना वठवावी लागणार आहे.

कोणताही नगरसेवक विरोधात जाणारा नसला तरी शहर विकासासाठी दिलेला शब्द पाळण्याची व त्यासाठी झोकून काम करण्याची वृत्ती सर्वच नगरसेवकांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारीही ना. महाजनांचीच असणार आहे. 2003 साली जामनेर नगरपालिका स्थापन झाली.

पहिल्या वेळी राष्ट्रवादीकडे बहुमत होते. 2008 ला 20 पैकी 15 नगरसेवक भाजपाचे निवडून आले, ना. महाजन यांच्या पत्नी सौ.साधना महाजन यांच्याकडे नगराध्यक्षपद दिले गेले. या काळात बर्‍याचशा भाजपा नगरसेवकांच्या अधिकारांचे आकुंचन झाले होते. त्याचा फटका बसला आणि 2013 ला सत्तांतर होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाले. मात्र ना.महाजनांनी अडीच वर्षातच तख्त पालटला.

आघाडीचे पाच नगरसेवक भाजपाकडे आले, नंतर पुन्हा पाच जण आले आणि आघाडीत अवघे चौघे उरले होते. गेल्या अडीच वर्षातच महाजनांना मंत्रिपदही मिळाले, पदाचा पुरेपूर वापर करुन घेत त्यांनी सुमारे साडेतीनशे कोटींची विकास कामे खेचून आणली. त्याचा फायदा त्यांना झाला, पालिकेत शतप्रतिशत भाजपा असे चित्र तयार झाले.

जामनेरकरांनी विकासाला संपूर्ण साथ देऊन विरोध संपवून टाकला आहे. एकहाती विजयाबद्दल ना.महाजनांचे अभिनंदनच पण विरोधकमुक्तीच्या आनंदाचे रुपांतर स्वैराचारात होऊ न देण्याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. अन्यथा एकहाती सत्ता देणारे जामनेरकर 2013 ची पुनरावृत्तीही करु शकतात, हे ध्यानात ठेवले पाहिजे.

LEAVE A REPLY

*