तितूर व डोंगरी नदीचे पुनरुज्जीवन: आ.उन्मेष पाटील

0
चाळीसगाव | प्रतिनिधी : शहारासह तालुक्यातील मुख्य प्रवाहिनी असलेल्या तितूर व डोंगरी नदीच्या माथ्यापासून ते ४० कि.मी. पर्यंत पसरलेल्या पायथ्या पर्यंतच्या जमिनींचा शाश्वत विकास होण्यासाठी व बारमाही पाणी मिळावे, या उद्देशाने नदीचे रुंदीकरण व विस्तारीकरण करून पुनर्जीवन करण्याचा संकल्प बुधवारी आमदार उन्मेश पाटील यांनी शिंदी येथे झालेल्या कार्यक्रमात केला.

व्यासपीठावर औरंगाबाद येथील नाम फौन्डेशनचे जलतज्ञ आनंद आसोलकर, प्रांताधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, गटविकास अधिकारी मधुकर वाघ, तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत, लघुसिंचन उप अभियंता विष्णू पोतदार, जलसंपदा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन पाटील, उप अभियंता राहुल पाटील, स्थापत्य अभियंता धनंजय गायकवाड आदि उपस्थित होते.

आमदार उन्मेशदादा पाटील पुढे म्हणाले की, जुनपानीच्या डोंगरात या नद्यांचा उगम असून त्यापासून ते थेट हिंगोणे सीम पर्यंत नदीची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी नदीची नाल्यासारखी अवस्था झाली असून या नदीवर मुसळधार पावसाच्या वेळी पाणी वाहून वाया जाते.

नदीच्या अरुंद पात्रामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील ४० कि.मी.लांब वाहणारी नदीचे रुंदीकरण व विस्तारीकरण करून नदी परिसरात जमिनींना या पाण्याचा बारमाही लाभ व्हावा व परिसरातील शेतकरी बांधवांचा शाश्वत विकास व्हावा यासाठी या नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प केला आहे,

शिंदीचे सरपंच गोरख राठोड यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात, या कामामुळे आमच्या परिसराचा कायापालट होणार असल्याची भावना व्यक्त केली. तर यावेळी के बी दादा साळुंखे, व्ही व्ही पोतदार, राजेश ठोंबरे, आनंद आसोलकर, संजय पाटील, प्रांताधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे आदिनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य कैलास पाटील,भाऊसाहेब पाटील, सुभाष पाटील, लताबाई दौंड, वनविभागाचे संजय मोरे, उद्यान पंडित बाळासाहेब राउत, माजी प.स.सदस्य दिनेश बोरसे, मार्केट संचालक मच्छीद्र राठोड, राविचे संचालक विश्वास चव्हाण, शिंदी उपसरपंच अंजनाबाई राठोड,करगावचे दिनकर राठोड, संतोष राउत, नरेंद्र जैन, जितु वाघ, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, यांच्यासह परिसरातील शिंदी, घोडेगाव, करजगाव, राजदेहरे आदी गावांचे सरपंच व सदस्य उपस्थित होते.

असे होणार नदीचे पुनर्जीवन

सदर नदी पुनर्जीवन कामाचे २ टप्प्यात रुंदीकरण व विस्तारीकरण केले जाणार आहे यात जुनपानी, खराडी, चतुर्भुज तांडा, शिंदी, गणेशपूर, चितेगाव, तांबोळे, खडकी, पाटखडकी, चाळीसगाव शहर, ओझर, पातोंडा, बोरखेडा, वाघळी व हिंगोणे गावांपर्यंत या नदीपात्राचे रुंदीकरण व विस्तारीकरण करून निघालेली माती दोन्ही बाजूला लावून पात्राची उंची वाढणार आहे.

यापैकी जुनपानी ते चाळीसगाव या प्रथम टप्यात ७ कोटींचा आराखडा तयार असून ३ कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. यात तांबोळे ते गणेशपूर पर्यंत ६ पोकलॅड मशिनीच्या माध्यमातून नदी खोलीकरण गेल्या ८ दिवसांपासून सुरु आहे.

या संपूर्ण कामासाठी ग्रामस्थांचा, लोकप्रतिनिधी विविध खात्यांच्या अधिकार्‍यांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत जलतज्ञ व नाम फौन्डेशन चे अभियंता आनंद आसोलकर (औरंगाबाद) यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

*