निलगाईंच्या बंदोबस्तासाठी शेतकर्‍यांचा मोर्चा : उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आश्वासन

0

जळगाव |  प्रतिनिधी : जळगाव, जामनेर आणि भुसावळ तालुक्यात शेती उध्वस्त करणार्‍या निलगाईंचा तात्काळ बंदोबस्त करा या मागणीसाठी परीसरातील शेतकर्‍यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद, बेळी, निमगाव, भागपुर, कंडारी, उमाळे, कुसूंबा, जामनेर तालुक्यातील नेरी, गाडेगाव, भुसावळ तालुक्यातील सुनसगाव, बेलव्हाळ, वराडसीम, गोजोरे, गोंभी, कुर्‍हा (पानाचे), मांडवे दिगर, शिंदी, सुरवाडे, खंडाळा, मोंढाळा या शिवारांमध्ये निलगाईंनी गेल्या काही वर्षांंपासुन अक्षरश: धुडगुस घातला आहे.

त्यामुळे पिके हाती येण्याआधीच ती उध्वस्त होत आहेत. दिवसभर शेतात राबुनही रात्री देखिल शेतकर्‍यांना पहारा द्यावा लागत आहे. यासंदर्भात वनअधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.

त्यामुळे आज जळगाव, जामनेर, आणि भुसावळ तालुका परीसरातील शेतकर्‍यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची मजुर फेडरेशनच्या कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

१२ जूननंतर जिल्हाधिकारी पाहणी करणार

जिल्हाधिकारी कार्यालयात गुलाबराव देवकर यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याशी चर्चा केली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी दि. १२ जूननंतर या परीसरांना भेटी देऊन आवश्यक त्या उपायोजना करण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले.

याप्रसंगी नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन, माधव पाटील, गणपत पाटील, साण्डु पहेलवान, सैय्यद नजीर अली, वाल्मीक पाटील, गिरीष पाचपांडे, निलेश रोटे, सुभाष पाटील, अरूण मराठे, चारूदत्त जंगले, विनोद रंधे, चंद्रकांत पाटील, पंढरीनाथ मराठे, मिठाराम नारखेडे, रविंद्र चौधरी, विलास चौधरी, अशोक सुर्वे, वामन चौधरी, श्रीधर झोपे, किरण चौधरी, पुरूषोत्तम बोंडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*