Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

पाल पर्यटन क्षेत्रासाठी अधिक निधी आणू : आ. हरीभाऊ जावळे

Share
पाल, ता. रावेर । दि. 26 । वार्ताहर :   पाल पर्यटनक्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार हरीभाऊ जावळे यांनी केले.

पाल सह परिसरातील जंगलाच्या सानिध्यातील आदीवासी बांधवांच्या रोजगार निर्मिती आणि व्यवसाय वृद्धीसाठी महाराष्ट्र शासनांंतर्गत वन मंत्री सुधीर मुनगट्टीवार याचे संकल्पनेतून संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून साकारण्यात आलेले जळगाव जिल्ह्यातील पहीले वन धन, जन धन किरकोळ विक्री केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

जंगलातील रानमेव, भाजीपाला, फळे आणि आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, वनौषधी या विक्रीसाठी ठेवण्यात येत असून या केंद्राचे उद्घाटन आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प. स. सभापती सौ माधुरी नेमाडे, उपवनसंरक्षक प्रकाश मोरणकर, जि.प.चे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, तहसीलदार विजय ढगे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष विलास चौधरी, जि.प. सदस्य हर्षल पाटील, पी. के. महाजन, कृउबा सदस्य गोपाळ नेमाडे, वन कर्मचारी प्रशिक्षण केंद्र संचालक कृष्णा भवर, सहा वन संरक्षक वसंत पवार, रमाकांत भवर, सरपंच हजरा तडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंद वायकोळे, अर्जुन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्ष पूजन करून केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तू विकत घेण्याचा मोह मान्यवरांना आवरता आला नाही.

प्रास्ताविकात वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी वन धन खरेदी आणि विक्री धोरण स्पष्ट केले. यानंतर सुरेश धनके यांनी रावेर वन परीक्षेत्र मधील झालेल्या कामांचे कौतुक केले. नंदकिशोर महाजन यांनी म्हटले की लहानपणापासून पाल थंड हवेचे ठिकाण म्हणून मी ऐकत होतो. मात्र मागील काही वर्षात या पर्यटन क्षेत्राने रंग बदलला असून खर्‍या अर्थाने पर्यटन स्थळ विकास होत असल्याचे सांगितले.

श्री मोरणकर यांनी भविष्यात करावयाच्या विकास कामांची माहिती दिली. यात पाल मार्गदर्शिका, व्हिडीओ सीडी तयार करून पर्यटकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

आ. हरिभाऊ जावळे यांनी मनोगतात म्हटले की, पाल गावाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करवून देऊ. सातपुडा हरित झाल्यास पाण्याची देखील समस्या आपोआप दूर होतील. अनेक आदिवासी युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होतील. आपल्या जंगलातील माल हा गावातच विक्री होऊन आपली उपजीविका भागविली जाईल. पर्यटन वाढीस लागावे म्हणून आवश्यक असलेल्या विकासकामांचा प्रस्ताव तयार करून दिल्यास वन मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार सहा वन संरक्षक वसंत पवार यांनी मानले. यावेळी समिती अध्यक्ष जुम्मा तडवी, कामील शेख, संजय पवार, सूर्यभान पाटील, सत्तार शेख, इतबार तडवी, शरीफ तडवी, परिसरातील अधिकारी व्ही एम पाटील, एम बी पाटील,  राजेश पवार वन्यजीव वनक्षेत्रपाल श्री अक्षय मेत्रे, जामन्या वनक्षेत्रपाल श्री राऊत यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!