त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की..!

0
जळगाव । भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील जैन मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. यात भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान असलेल्या चांदीच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी घोड्यांवर फेटे बांधलेले ध्वजधारी बालक, ढोल पथक, कलशधारी महिला तसेच भगवान महावीरांच्या जीवनावरील सजीव देखावे साकारण्यात आल्याने शोभायात्रेने लक्ष वेधून घेतले. यात त्रिशलानंद वीर की जयबोलो महावीर की, अहिंसा परमो धर्म आदी घोषणा देण्यात आल्या.

भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवांतर्गत सकाळी काँग्रेस भवनासमोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरात संघपती दलुभाऊ जैन, समिती प्रमुख दिलीप गांधी, मनोज सुराणा, राजेश जैन, भागचंद जैन यांच्याहस्ते ध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर आठ वाजता महावीर स्वामींच्या सवाद्य मिरवणुकीस मंदिरापासून सुरुवात झाली. टॉवर चौक,चौबे चौक, सुभाष चौक, रथ गल्ली, बोहरा गल्ली, चित्रा चौक मार्गे बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

सजीव आरासद्वारे भगवान महावीरांच्या जीवनावर प्रकाशझोत
या शोभायात्रेत हत्तीवरील अंबारीत विराजमान असलेल्या भगवान महावीर यांच्या त्रिशला माता, चंदनबालाद्वारे भगवान महावीरांचा पारणा, राजकुमारी चंदनबालाद्वारे भगवान महावीरांचे पाच महिने पंचवीस दिवसांचे उपवास यासह भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे साकारण्यात आले होते. या देखाव्यांच्या माध्यमातून भगवान महावीरांनी दिलेले अहिंसेचे संदेश देण्यात आले. यासह जैन धर्मातील ऋषभदेवजी, अजितनाथजी, सम्भवनाथजी, अभिनन्दनजी, सुपार्श्रवनाथजी, चंद्रप्रभुजी, सुविधिनाथजी, शीतलनाथजी, श्रेयांसनाथजी वासुपुज्यजी या सर्व बारा तीर्थंकरांचे चित्रमय रथानेही लक्ष वेधून घेतले.

जैन साध्वींचीही उपस्थिती
शहरातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत जैन साध्वीचींही उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महिला वर्गांसमवेत संपुर्ण मिरवणूक मार्गात भगवान महावीरांचा जयघोष केला. तसेच महिला भाविकांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

*