अण्णा समर्थकांनी सावध राहावे!

0
महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही पक्षाचे वा आघाडीचे सरकार असले तरी ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी नेते अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारासह जनहिताच्या प्रश्नांवर वेळोवेळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

आतादेखील अण्णांनी शेतकरी प्रश्न तसेच लोकपाल-लोकायुक्त नियुक्तीसह इतर मागण्यांसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर सत्याग्रह आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. वयाची ऐंशी उलटली तरी आजही तरुणाईला लाजवेल एवढा जोश अण्णांमध्ये पाहावयास मिळतो.

अण्णांच्या राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत. आंदोलनाआधी अण्णांनी देशभर सभा घेऊन जनजागृती केल्याने देशातील जनतेचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. काल अण्णांचे वजन तीन किलोंनी घटल्याचे सांगितले जात आहे. अण्णांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनस्थळी जमत आहेत.

आंदोलन करण्यामागे अण्णांचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नाही. जनहित व देशहितासाठीच त्यांचा संघर्ष सुरू आहे. वयाचा विचार करता अण्णांना हे आंदोलन झेपणारे नाही, पण त्यांना जिवाची पर्वा वाटत नाही. अण्णांनी व त्यांच्या समर्थकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कारण भ्रष्टाचारविरोधी गर्जना करणार्‍या सरकारच्या कारकिर्दीतच विजय मल्ल्या व नीरव मोदीसारख्या ‘उद्योग’पतींचा देशातील सरकारी बँकांना लुबाडण्याचा आणि विदेशात पलायनाचा मार्ग सोपा झाला. सरकार मात्र हात चोळत मागील सरकारला दोष देत स्वत:चा बचाव करीत आहे. अण्णांनी आपल्या मागण्यांबाबत मोदी सरकारला आतापर्यंत चाळीसहून जास्त पत्रे लिहिली.

अडचणीत सापडलेले एखादे कुटुंब, एखादी असहाह्य मुलगी वा अन्यायग्रस्ताने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिताच त्या पत्रांना ताबडतोब प्रतिसाद दिला जातो. संवेदनशीलतेच्या देखाव्यापुरत्या नमुन्याची भरपूर जाहिरात केली जाते. तरीही अण्णांच्या पत्रांना उत्तर का दिले जात नसावे? की त्यांच्या मागण्या अडचणीत आणतील असे सरकारला वाटते? अण्णांचा जीव मोलाचा आहे, असे मानणारे राज्यकर्ते एकेकाळी होते.

आताचे राज्यकर्ते तसा मानवतावादी दृष्टिकोन बाळगतीलच असे नाही. नथुराम गोडसेंना सर्वोच्च देशभक्त मानणार्‍यांचाही मोठा जमाव देशात सुखेनैव वावरतो आहे. म्हणून अण्णा समर्थकांनी डोळ्यांत तेल घालून सावध राहिले पाहिजे. साधनशुचिता सध्याच्या राजकारणाला वर्ज्य आहे.

हे लक्षात घेऊन आंदोलन भरकटणार नाही अथवा त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, याची जबाबदारी अण्णांच्या समर्थकांना कसोशीने पार पाडावी लागेल.

LEAVE A REPLY

*