बहिणाबाईंचा यथार्थ गौरव

0
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केेली आहे. 15 ऑगस्ट 1990 रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. यात जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला.

विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्याची मागणी सर्वपक्षीय संघटना व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वारंवार केली जात होती. असा निर्णय घेऊन सरकारने बहिणाबाईंचा व या विद्यापीठाचा उचित गौरव केला आहे. बहिणाबाई रुढार्थाने निरक्षर होत्या. तथापि त्यांच्या काव्यरचनेतून त्यांच्या अलौकिक तेजस्वी प्रतिभेचे दर्शन होते. त्यांना कोणताही साहित्यिक वारसा नव्हता.

कुटुंबात काव्यप्रतिभेला पोषक वातावरण नव्हते. तरीही त्यांना हे सुचते कसे, असा प्रश्न त्यांना एकदा विचारला गेला. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, ‘माझी माय सरसोती मला शिकविते बोली। लेक बहिनाच्या मनी किती गुपितं पेरली’. कुटुंबाच्या व समाजाच्या रोजच्या जगण्याच्या अनुभवातून त्यांची कविता जन्माला आली. म्हणूनच खान्देशी बोलीतील त्यांच्या कविता व ओव्यांचे स्वत:चे वेगळे विश्व आहे.

त्यांचे चिरंजीव सोपानदेवांनी त्यांच्या कविता आचार्य अत्रे यांना वाचायला दिल्या तेव्हा ‘हे बावनकशी सोने आहे. आतापर्यंत का लपवून ठेवले?’ असा उत्स्फूर्त प्रश्न त्यांनी विचारला होता. ‘बहिणाबाईंनी सख्ख्या आईप्रमाणे आमची आयुष्ये समृद्ध केली’ असा गौरव पु. ल. देशपांडे यांनी केला होता.

वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. विपरीततेशी झुंजावे लागले; पण त्याविषयीची कटूता त्यांच्या काव्यात कुठेही आढळत नाही. उलट ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर। आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’ असे संकटांवर मात करीत जगण्याचे तत्त्वज्ञान त्यांनी काव्यातून सांगितले आहे.

विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यातच सरकारने धन्यता मानता कामा नये किंवा राजकीय खेळी म्हणून या निर्णयाकडे पाहिले जाऊ नये. विद्यापीठात त्यांचे अध्यासन केंद्र सुरू करता येईल. त्या केंद्रामार्फत बहिणाबाईंच्या साहित्यावर संशोधनाला पाठबळ देता येईल. त्यांचे साहित्य केंद्र निर्माण करता येईल.

त्यानिमित्ताने त्यांचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी जिज्ञासूंना उपलब्ध होऊ शकेल. बहिणाबाईंच्या जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करता येईल. समाजात अलौकिक कार्य करणार्‍या ज्ञानपीठांची व विद्यापीठांची संख्या मोठी आहे. त्यांची दखल सरकारने घ्यावी.

राजकारण्यांच्या नसत्या उद्योगांमुळे भरकटत चाललेल्या शिक्षणाऐवजी समाजाला जगण्याचे बळ देणार्‍या साहित्यावर राज्याच्या शैक्षणिक धोरणाचे पुनर्निर्माण करावे. ही अपेक्षा सध्याचे आत्मकेंद्री शिक्षण खाते पुरी करू शकेल का?

LEAVE A REPLY

*