भारताने निधास चषक जिंकला

0
कोलंबो । निधास ट्रॉफी टी 20 तिरंगी मालिकेतली अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार ठोकत भारताच्या विजयाची गुढी उभारली.

कोलंबो येथे झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने 4 गडी राखत बांगलादेशवर विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी भारताला 5 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने लगावलेल्या षटकारामुळे भारताचा विजय झाला आणि निधास ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले गेले. भारताचा तरूण खेळाडू वॉश्गिंटन सुंदरला मालिकावीर तर आज आठ चेंडूत 29 धावांची अविस्मरणीय खेळी करणारा दिनेश कार्तिकला सामनावीर किताब देवून गौरविण्यात आले.

निदाहास चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावत 166 धावा जमवल्या. भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडू पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अखेरच्या षटकात भारताला 12 धावांची गरज होती. 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकर स्ट्राईकवर होता.सौम्या सरकारने पहिलाच चेंडू वाईड टाकला. यष्टीरक्षकाच्या हातात गेलेल्या यानंतरच्या चेंडूवर धाव घेता आली नाही.

दुसर्‍या चेंडूवर विजय शंकरने एक धाव घेतली आणि दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला. दुसरी धाव घेण्यासाठी विजय शंकरने नकार दिला. त्यामुळे दिनेश कार्तिक स्ट्राईकवर राहिला. तिसर्‍या चेंडूवर कार्तिकने एक धाव घेतली आणि पुन्हा एकदा विजय शंकर स्ट्राईकवर आला.

अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विजय शंकरने शानदार चौकार ठोकला आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र पुढच्याच म्हणजे पाचव्या चेंडूवर विजय शंकर मोठा फटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला. सुदैवाने अखेरच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर दिनेश कार्तिकच होता आणि विजयासाठी एका चेंडूत 5 धावांची आवश्यकता होता. सर्वांनी श्वास रोखून धरले होते.

दिनेश कार्तिकचा विश्वविक्रम
दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. अखेरच्या चेंडूवर 5 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची गरज असताना षटकार ठोकणारा तो आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातला पहिला खेळाडू ठरला आहे.

LEAVE A REPLY

*