जनावरांच्या मांसाच्या गाड्या पकडल्या !

0
उदापूर / भाजीपाला आणि दूध शहराकडे जाऊ नये, यासाठी नगर-कल्याण महामार्गावर गस्त घालणार्‍या संपकरी शेतकर्‍यांना दोन वाहनांत जनावरांचे मांस आढळून आले. मढ पारगाव येथे गुरुवारी रात्री, तर उदापूर येथे शुक्रवारी सकाळी ह्या गाड्या पकडल्या.
ओतूरचे ठाणे अंमलदार विकास गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मढ पारगाव येथे अडविलेल्या एका टेंपोत जनावरांचे मांस आढळून आले.
टेंपोचालक मात्र पळून गेला. संपकरी शेतकरी नीलेश लोहोटे (रा. डिंगोरे) यांनी फिर्याद दिली. त्यावरून ओतूर पोलिसांनी अंदाजे दोन लाख 14 हजार रुपये किमतीचे 4280 किलो जनावराचे मांस, दोन लाखांचा टेंपो (एमएच 04, एचवाय 153) असा एकूण 4 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. फरारी टेंपो चालकावर गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
उदापूरच्या हद्दीत वन विभागाच्या रोपवाटिसमोर शुक्रवारी सकाळी बोलेरो पीकअपमध्ये (एमएच 03, सीडी 031) 1110 किलो गोमांस बर्फात ठेवलेले आढळले.
बनकर फाटा येथील संपकरी शेतकरी गाड्या तपासत असताना हे गोमांस दिसून आले. चालक पीकअप सोडून पळून गेला. पंकज पारखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात पीकअप चालकावर गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यान्वे ओतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंदाजे 77 हजार रुपये किमतीचे 1110 किलो गोमांस आणि 1 लाख 50 हजार रुपये किमतीची बोलेरो पीकअप असा एकूण 2 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
महामार्गावर ओतूर, बनकरफाटा, मढ, पारगावफाटा येथे थांबून शेतकर्‍यांना शेतीमाल शहरात नेऊ नये, अशी विनंती जुन्नर तालुक्यातील संपकरी शेतकरी करत होते. त्या वेळी वरील घटना उघडकीस आल्या.

LEAVE A REPLY

*