झोपेचाही होणार अभ्यास!

0
आयुर्वेदाने निद्रेला (झोपेला) आयुष्याचा आधारस्तंभ म्हटले आहे. दिवसभराच्या धकाधकीनंतर माणसाला रात्री शांत झोप लागणे हे निरायम आरोग्याचे प्रमुख लक्षण मानले जाते. अपुरी झोप, निद्रानाश ही दिवसेंदिवस आरोग्याची प्रमुख समस्या बनू पाहत आहे.

या विषयावर आयुर्वेदात सखोल व गांभीर्याने विचार केलेला आढळतो. आधुनिक वैद्यकशास्त्रातही झोप हा महत्त्वाचा व अभ्यासाचा विषय आहे. राज्याच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘फेलोशिप इन स्लिप मेडिसीन’ नावाचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती निद्राविषयकतज्ञ डॉ.सुशांत मेश्राम यांनी दिली आहे.

अपुर्‍या झोपेचे अनेक दुष्परिणाम आधुनिक वैद्यकशास्त्रानेही मान्य केले आहेत. अपुरी झोप अनेक दुर्धर व्याधींचे प्रमुख कारण ठरते. बदललेली जीवनशैली, वाढती स्पर्धा व ताणतणाव, समाजमाध्यमांचे व्यसनात होत असलेले रूपांतर यामुळे मानवी जीवनातील झोपेचे नैसर्गिक चक्र उद्ध्वस्त होत आहे.

अनेकांसाठी गाढ झोप दुर्मिळ होत आहे. एका वैद्यकीय संशोधनानुसार नऊ टक्के भारतीय निद्रानाशाने ग्रस्त आहेत. तीस टक्के भारतीयांना रात्रभर अजिबात झोप लागत नाही. वैद्यकतज्ञांच्या कथनानुसार झोपेत श्वास घेण्यास त्रास होणे, दिवसभर पेंगत राहणे, झोपेत चालणे, झोपेतच इतर हालचाली करीत राहणे, झोपेतून जागे झाल्यानंतरही स्वप्नवत वाटणे किंवा गोंधळल्यासारखी स्थिती होणे हे झोपेशी संबंधित विकार मानले जातात.

या व अशा अनेक मुद्यांवर अधिक संशोधन करण्याची संधी नव्या अभ्यासक्रमामुळे निर्माण होणार आहे. झोपेच्या शास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी कॉलेज ऑफ मेडिसीन शिकागो येथे स्लिप सेंटर तर युनिव्हर्सिटी ऑफ मिशीगनमध्ये सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर स्लिप सायन्स असे स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत.

भारतातही काही डॉक्टरांनी एकत्र येऊन 2010 साली ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्लिप सायसेन्स’ नावाची संस्था स्थापन केली आहे. मानवाचे जीवनचक्र सुरळीत सुरू राहण्यास शांत झोपेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या विषयावर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. ही गरज आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लक्षात आली असावी. अर्थात या निर्णयाचे परिणाम माहीत होण्यास काही काळ जावा लागेल;

पण सर्वसामान्यांकडून अत्यंत दुर्लक्षित राहणारी व अनारोग्याचे कारण ठरणारी झोप आता अभ्यासाचा एक विषय ठरते आहे व तरुणाईच्या कल्पकतेला नवी संधी निर्माण होत आहे हे स्वागतार्ह चित्र आहे.

LEAVE A REPLY

*