नेतृत्वाची अक्षमता अन् विकासाची संथगती

0

चेतन चौधरी

मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेतून ग्रामविकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात. येथूनच ग्रामविकासाची गंगा वाड्या-वस्त्यांवर पोहचते. या विकासरुपी गंगेचा प्रवाह पेलविण्यासाठी सामर्थ्यही असणे गरजेचे आहे.

मात्र जिल्हा परिषदेत सक्षम नेतृत्वाअभावी विकासाचा प्रवाह मंदावला असून अतिशय कुर्मगतीने कामे होत असल्याने ग्रामीण भागातील समस्या वाढीस लागत असल्याचे चित्र आहे. गल्ली ते दिल्ली सत्ता असणार्‍या भाजपाची जिल्हा परिषदेतही सत्ता आहे.

त्यामुळे विकासकामे करण्यास सत्ताधार्‍यांना अधिक पोषक वातावरण आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी हवा तेवढा निधी वरिष्ठ पातळीवरुन मंजुर करता येऊ शकतो. यातून ग्रामीण भागाचा विकास साधला जाऊन समस्यांचे निराकारण होऊ शकते.

परंतु जि.पत सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने आहे तोच निधी खर्च करता येत नाही. यामुळे विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांकडूनही रोष व्यक्त केला जात आहे. जि.पला जिल्हा नियोजन मंडळाकडून 3054 व 5054 हेडखाली रस्त्यांसाठी मिळालेला 22 कोटींचा निधी खर्च न झाल्याने दरवर्षाला दीडपट वाढवून मिळणार्‍या निधीला येत्या वर्षात कात्री कात्री लागणार आहे.

हा निधी मार्च पर्यंत खर्च झाला असता तर याच्या दीडपटीने वाढीव निधी मिळण्यास मदत झाली असती परंतु नियोजन करण्यास पदाधिकार्‍यांना अपयश आले असल्याचे दिसून येते. यंदा नियोजन वेळेवर न झाल्याने निधी खर्च होऊ शकला नाही.

मात्र, मिळालेला निधी दोन वर्षे खर्च करता येतो, असे सांगून पदाधिकार्‍यांकडून आता हात वर केले जात आहेत. घरकुल लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत मजूरांचे मानधन देखील थकले आहे. यात नोडल ऑफीसर नेमण्याची मागणी सदस्यांनी केली असता पंचायत समितीच्या पातळीवर प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याने यात अधिकारी नेमण्याची गरज नसल्याचे प्रशासानकडून सांगितले जाते.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र आरटीई अंतर्गत प्रवेश देणार्‍या जिल्ह्यातील 250 हून अधिक शाळांना गेल्या तीन वर्षापासूनचे शासनाचे अनुदान मिळालेले नाही. या विद्यार्थ्यांवर आतापर्यंत शैक्षणिक साहित्यासह लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.

मात्र अनुदानच मिळत नसल्यामुळे संस्थाध्यक्षांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पदाधिकार्‍यांच्या सुस्त काराभारामुळे प्रशासनावर पकड राहिली नसल्याने अनागोंदी सुरु असल्याचे दिसून येत आहे.

यासाठी आवश्यकता आहे ती सक्षम नेतृत्वाची जि.पतील सत्ताधार्‍यांनी मरगळ सोडून जोमाने कामे केल्यास नक्कीच या समस्या सुटण्यास वेळ लागणार नाही.

LEAVE A REPLY

*